Join us  

दाऊद इब्राहिमच्या दक्षिण मुंबईतल्या तिन्ही मालमत्तांचा 11 कोटींना लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 2:12 PM

मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतल्या तिन्ही मालमत्तांचा आज लिलाव झाला आहे.

मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतल्या तिन्ही मालमत्तांचा आज लिलाव झाला. दाऊद इब्राहिमच्या मुंबईतल्या डांबरवाला इमारत, शबनम गेस्ट हाऊस व अफरोज हॉटेल या तिन्ही मालमत्तांचा 11 कोटी रुपयांमध्ये लिलाव झाला. सैफी बु-हाणी ट्रस्टनं या मालमत्ता खरेदी केल्या आहेत. अफरोज हॉटेलचा चार कोटी रुपयांमध्ये लिलाव झाला आहे.1993च्या बॉम्बस्फोटानंतर केंद्र सरकारनं दाऊदच्या देशभरातील विविध ठिकाणच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या. लिलावाद्वारे त्यांची विक्री केली जात असली तरी दाऊदच्या दहशतीमुळे त्या खरेदी करण्यासाठी फारसे कोणी पुढे येत नव्हते, परंतु सैफी बु-हाणी ट्रस्टनं या सर्व मालमत्ता खरेदी केल्या आहेत.दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरातील पाकमोडिया स्ट्रीटवरील दाऊदच्या संपत्तीचा लिलाव केला गेलाय. त्यामध्ये याकूब रस्त्यावरील शबनम गेस्ट हाऊस, पाकमोडिया रस्त्यावरील डांबरवाला इमारतीतील 5 घरे व हॉटेल रौनक अफरोज यांचा समावेश आहे. हॉटेलची मूळ किंमत 1 कोटी 15 लाख आहे. परंतु ते चार कोटी रुपयांमध्ये विकलं गेलं आहे. हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी अफरोज हॉटेलवर बोली लावली होती. परंतु सैफी बु-हाणी ट्रस्टनं ही बोली जिंकली आहे.

 

टॅग्स :दाऊद इब्राहिममुंबई