नगरसेवकपदासाठी ९१३ इच्छुक
By Admin | Updated: April 8, 2015 00:38 IST2015-04-08T00:38:38+5:302015-04-08T00:38:38+5:30
महापालिकेच्या १११ प्रभागांसाठी ९१३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. २३१७ अर्जदारांपैकी १४०४ जणांनी अर्ज दाखलच केलेले नाहीत.

नगरसेवकपदासाठी ९१३ इच्छुक
नवी मुंबई : महापालिकेच्या १११ प्रभागांसाठी ९१३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. २३१७ अर्जदारांपैकी १४०४ जणांनी अर्ज दाखलच केलेले नाहीत. शेवटच्या दिवशी दहाही केंद्रांवर इच्छुक उमेदवारांनी व त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाल्याचे चित्र होते.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्यामुळे मंगळवारी शहरातील दहाही केंद्रांवर उमेदवार व समर्थकांनी गर्दी केली होती. ढोल-ताशांच्या गजरात शक्तिप्रदर्शन करून अर्ज भरण्यात येत होते. केंद्राबाहेर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. शिवसेनेच्या बंडखोरांनी भगवे कपडे, झेंडे घेऊन घोषणाबाजी केली आणि अर्ज दाखल केले. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांपेक्षा बंडखोरांनीच जास्त लक्ष वेधून घेतले होते. ३१ मार्चपासून २,३१७ जणांनी अर्ज घेतले होते. पहिल्या सहा दिवसांमध्ये २९४ जणांनी अर्ज दाखल केले होते. शेवटच्या दिवशी ६२१ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. तुर्भे विभागात सर्वाधिक ११८ अर्ज दाखल झाले असून दिघा परिसरात सर्वात कमी ६१ अर्ज दाखल झाले आहेत.
बंडखोरी रोखण्यासाठी सोमवारी मध्यरात्रीपर्यंत अनेकांना एबी फॉर्म देतो, असे सांगण्यात आले होते. उमेदवारी मिळत नाही हे लक्षात येताच अनेकांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही सर्वांचे अर्ज स्वीकारताना तारेवरची कसरत करावी लागत होती. (प्रतिनिधी)