कर्जतमध्ये 88 अतिकुपोषित
By Admin | Updated: October 30, 2014 22:28 IST2014-10-30T22:28:45+5:302014-10-30T22:28:45+5:30
कुपोषणाचा विळखा पुन्हा एकदा कजर्त तालुक्याला बसू लागला आहे. तालुक्यातील कळंब येथील एका सव्वा वर्षाच्या मुस्लीम समाजातील बालिकेचा कुपोषणाने बळी गेला होता,

कर्जतमध्ये 88 अतिकुपोषित
विजय मांडे - कर्जत
कुपोषणाचा विळखा पुन्हा एकदा कजर्त तालुक्याला बसू लागला आहे. तालुक्यातील कळंब येथील एका सव्वा वर्षाच्या मुस्लीम समाजातील बालिकेचा कुपोषणाने बळी गेला होता, मात्र प्रशासनाने हा विषय गंभीर न घेतल्याने कुपोषण आणखी बळी घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, कर्जत तालुक्यात तब्बल 88 अतिकुपोषित बालके आहेत, तर त्याच्या तिप्पट बालके कुपोषणाच्या विळख्यात असल्याचे समोर आले आहे.
कुपोषणामुळे नेरळजवळील दामत येथील आलिया तंबोळी या बालिकेचा मृत्यू झाला आणि तिच्या मृत्यूने कुपोषणाचा प्रश्न पुन्हा समोर आला. ती कळंब येथे राहात होती, मात्र नेरळ आणि कळंब यापैकी एकाही अंगणवाडी शाळेने या बालिकेची जबाबदारी घेतली नाही. त्याचवेळी एकात्मिक बालविकास विभागाच्या या दोन्ही ठिकाणच्या पर्यवेक्षिकांनी आपली जबाबदारी टाळत हात वर केल्याने वाढते कुपोषण असेच वाढू द्यायचे का?असा प्रश्न समोर येत आहे. कारण कुपोषण रोखण्याची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या कर्जतच्या एकात्मिक बालविकास विभागाला प्रकल्प अधिकारीच नाही. कर्जत तालुका लोकसंख्या आणि भौगोलिकदृष्टय़ा मोठा असल्याने तेथे शासनाने दोन प्रकल्प तयार करून दोन प्रकल्प अधिका:यांची नियुक्ती केली, पण गेल्या दीड वर्षापासून ही दोन्ही प्रकल्प अधिका:यांची पदे रिक्त असल्याने प्रभारी अधिका:यांच्या भरवशावर कर्जतमधील 323 अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडय़ांचा कारभार सुरू आहे. प्रभारी अधिकारी नसल्याने अंगणवाडीमध्ये पोषण आहार घेण्यासाठी येणा:या वीस हजार बालकांकडे दुर्लक्ष होत आहे. अंगणवाडय़ांची दर महिन्याला तपासणी होणो गरजेचे असतानाही विभागाच्या पर्यवेक्षिका गावोगाव पोहोचत नाहीत.
परिणामी, कर्जत तालुक्यातील कुपोषण वाढत आहे. त्यामुळे तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परिसरात तब्बल 88 अति कुपोषित बालके तुटपुंजा उपचार घेत आहेत. तालुक्यातील आदिवासी भागातील खांडस प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात पंधरा, तर आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात अकरा,कळंब प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात सहा, नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात वीस, मोहिली प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात तेरा आणि कडाव प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात तेवीस अतिकुपोषित बालके सध्या एकात्मिक बालविकास विभागाच्या नोंदीनुसार आहेत.
त्याचवेळी या सहा प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात 274 कुपोषित बालके असून त्यांना कुपोषणाच्या रेषेतून बाहेर काढण्यासाठी मोठय़ा प्रमाणात उपाययोजना राबविण्याची गरज आहे, शासन प्रकल्प अधिकारी पदे भरत नसतानाही कुपोषित बालकांची संख्या वाढण्यास मदत होत असल्याचे बोलले जात आहे.
ग्राम शिबिरांची गरज : प्रकल्प विभागाने आंबिवली आणि मोहिली येथील अतिकुपोषित बालकांसाठी ग्राम बाल सुधार केंद्र उभारले होते. महिनाभर त्या भागातील वीस कुपोषित बालके आपल्या आईसह राहून कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होते. अशी ग्राम शिबिरे कर्जत तालुक्याच्या सर्व भागात सुरु करण्याची गरज ही वाढलेली संख्या पाहून वाटत आहे.