Join us  

India China FaceOff: चिनी माल बहिष्कारास ८७ टक्के भारतीय तयार, अहवालातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 2:28 AM

चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकून त्यांना अद्दल घडवावी, असे ८७ टक्के भारतीयांचे मत असून तशा बहिष्काराची तयारी त्यांनी दर्शवली.

मुंबई : भारत, चीन सीमेवरील वाढता तणाव आणि २० भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावे लागल्यानंतर देशात चीन विरोधात रोष प्रचंड वाढत आहे. चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकून त्यांना अद्दल घडवावी, असे ८७ टक्के भारतीयांचे मत असून तशा बहिष्काराची तयारी त्यांनी दर्शवली.भारतीय उत्पादानांचा पुरस्कार करून त्यांना चालना द्यायला हवी असे मत ९७ टक्के भारतीयांनी व्यक्त केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विविध विषयांवरील सर्वेक्षण करणारी देशातील अग्रगण्य संस्था ‘लोकल सर्कल’च्या अहवालातून ही माहिती हाती आली. या सर्वेक्षणाला देशातील २३५ जिल्ह्यांतील ३२ हजार भारतीयांनी प्रतिसाद दिला. पुढील किमान एक वर्षासाठी चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची तयारी आहे का? या प्रश्नावर ८७ टक्के भारतीयांनी, ‘होय’ अशी प्रतिक्रिया दिली. तर, ७ टक्के लोक त्यासाठी तयार नसून उर्वरित ६ टक्क्यांना त्याबाबतची स्पष्ट भूमिका मांडता आली नाही. विवो, वन प्लस, क्लब फॅक्टरी, टिक टॉक, वुई चॅट यांसारख्या चिनी उत्पादनांची यापुढे नव्याने खरेदी करणार नाही किंवा त्या कंपन्यांच्या सेवा घेणार नाही असे ५८ टक्के भारतीयांनी सांगितले. तर, या सेवा वापरणाऱ्या ३८ टक्के लोकांनी विकत घेतलेल्या वस्तू वापरण्याविना इतर पर्याय नाही. परंतु, यापुढे खरेदी करणार नाही असे स्पष्ट केले.

टॅग्स :चीनभारत