वांद्रे येथील ८६ वृक्ष मृतावस्थेत!
By Admin | Updated: May 17, 2015 00:38 IST2015-05-17T00:38:01+5:302015-05-17T00:38:01+5:30
एस. व्ही. रोडवरील ७.५ एकरच्या वांद्रे तलावाच्या परिसरातील बाह्य भागात असलेल्या ८६ पाम वृक्षांच्या परीघ परिसराचे चुकीच्या पद्धतीने सिंमेटीकरण करण्यात आल्याने हे वृक्ष मृतावस्थेत गेले आहेत.

वांद्रे येथील ८६ वृक्ष मृतावस्थेत!
मनोहर कुंभेजकर ल्ल मुंबई
एस. व्ही. रोडवरील ७.५ एकरच्या वांद्रे तलावाच्या परिसरातील बाह्य भागात असलेल्या ८६ पाम वृक्षांच्या परीघ परिसराचे चुकीच्या पद्धतीने सिंमेटीकरण करण्यात आल्याने हे वृक्ष मृतावस्थेत गेले आहेत.
वॉचडॉग फाउंडेशनच्या माहितीनुसार, वृक्षांच्या मुळाशी पाणी झिरपण्यासाठी कंत्राटदाराने जागाच सोडलेली नाही. शिवाय वृक्षांचा संपूर्ण बाह्य परिसराचे सिमेंटीकरण केले आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानुसार, वृक्षांच्या परिसरात ६ बाय ६ फूट जागा मोकळी ठेवणे गरजेचे आहे. शिवाय सिमेंटीकरण केले जाऊ नये. मात्र येथे सिमेंटीकरणामुळे भूजलाची पातळी खालावेल आणि वृक्ष नाहीसे झाले तर पक्षीही दुरावतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. यावर फाउंडेशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवाय संबधितांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे उत्तर ई-मेलद्वारे त्यांनी दिल्याचे संस्थेचे ग्राँॅडफे पिमेंटा यांनी सांगितले.
नववर्षाच्या प्रारंभी शिवसेनेवर कुरघोडी करीत काँग्रेसने माजी खासदार प्रिया दत्त, महापालिकेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांच्या उपस्थितीत तलावाच्या सुशोभिकरणाचे उद्घाटन केले. तर भाजपानेही आमदार आशिष शेलार आणि उपमहापौर अलका केरकर यांच्या उपस्थितीत तलावाच्या सुशोभिकरणाचा नारळ फोडला होता.
महापालिका तलावाच्या सुशोभिकरणासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च करणार असून, याकरिता दड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. सुशोभिकरणामध्ये तलावातील गाळ काढणे, नौकायन, दगडी संरक्षक भिंत बांधणे, नागरिकांना तलावाच्या बाह्य भागात चालण्यासाठी पाथवे तयार करणे, बसण्यासाठी बाकड्यांची सुविधा आणि आवार भिंत बांधून त्यावर ग्रील बसवणे, विद्युतीकरण करणे याचा समावेश आहे.