Join us  

वेसावा कोळीवाड्यातील ८५ रुग्ण झाले कोरोनामुक्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 6:15 PM

वेसावा कोळीवाड्यात कोरोना रुग्णांची संख्या कागदावर १०५ इतकी  दिसत असली तरी त्यापैकी येथील ८५ कोरोना रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परत आले आहे.

मनोहर कुंभेजकर

मुंबई : वेसावा कोळीवाड्यात कोरोना रुग्णांची संख्या कागदावर १०५ इतकी  दिसत असली तरी त्यापैकी येथील ८५ कोरोना रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परत आले आहे. तर डोंगरी गल्लीतील 3 वर्षाच्या चिमुरडीसह एकाच कुटुंबातील ७ कोरोना रुग्ण यापूर्वी कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहे. त्यामुळे कोरोनाला जर सकारात्मक पद्धतीने सामोरे गेल्यास आणि वेळीच काळजी व उपचार घेतल्यास कोरोना रुग्ण हा कोरोना मुक्त होऊ शकतो हे वेसावकरांनी दाखवून दिले आहे. तर कोरोना आटोक्यात आणण्यात वेसावा कोळी जमात ट्रस्टने वेळीच केलेल्या उपाययोजना आणि वेसावकरांनी केलेले सहकार्य मोलाचे असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष सचिन चिंचय यांनी सांगितले.

वेसावा कोळीवाड्याची लोकसंख्या दाट असल्याने सुरुवाती पासूनच हा विभाग रेड झोन मध्ये होता. येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता तेथील वेसावा कोळी जमात ट्रस्टने येथील प्रत्येक गल्लीच्या कार्यकर्त्यांची फळी उभी करून ११ ते १३ एप्रिल,२४ ते २६ एप्रिल व १ ते ७ मे या काळात तीनदा जनता कर्फ्यू सारखे जालीम उपाय यशस्वी करून दाखवले. तसेच वेळोवेळी परिसर सॅनिटाईझ करून घेतला.येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फिव्हर क्लिनीक वेसावे गावात सुरू करून ही संख्या नियंत्रणात आणली होती. त्यामुळेच येथे कोरोना रुग्णांची संख्या मर्यादेतच वाढत असल्याचे  सचिन चिंचय व ट्रस्टचे सचिव राजहंस लाकडे यांनी सांगितले. येथील १०५ कोरोना रुग्णांपैकी  कोळी बांधवांची संख्या ७२ असून यापैकी ६८ रुग्ण   बरे होऊन घरी परतले, तर उर्वरित घरी परतलेले १७ कोरोना रुग्ण हे या वर्सोवा परिसरातील असल्याचे या ट्रस्टचे खजिनदार ओमकार भिंबाले यांनी सांगितले.

सुमारे ६.५ लाख लोकसंख्या असलेल्या के पश्चिम वॉर्ड मध्ये पालिका प्रशासनाने देखिल कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या. त्यामुळे येथील १३०० कोरोना रुग्णांपैकी सुमारे ६०० कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले, अशी माहिती के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी व्यक्त केला. मात्र नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये,घरात सुरक्षित राहावे असे आवाहन त्यांनी लोकमतच्या माध्यमातून येथील जनतेला केले आहे. पालिका प्रशासनाने वेसावे कोळीवाड्याकडे जातीने लक्ष दिले, अशी प्रतिक्रिया कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस