आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी ८२२ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:32 IST2021-02-05T04:32:28+5:302021-02-05T04:32:28+5:30
मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासन कोरोनानंतर आरोग्यसेवा क्षेत्राचे महत्त्व जाणेल अशी अपेक्षा असताना अर्थसंकल्पात मात्र निधी कपात करण्यात आला. ...

आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी ८२२ कोटींचा निधी
मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासन कोरोनानंतर आरोग्यसेवा क्षेत्राचे महत्त्व जाणेल अशी अपेक्षा असताना अर्थसंकल्पात मात्र निधी कपात करण्यात आला. आरोग्य क्षेत्रासाठी २०२१-२२ च्या सुधारित अर्थसंकल्पात ७८०.६९ कोटी आणि २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात १२०६.१४ कोटी इतकी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यापैकी ८२२.७२ कोटींची तरतूद दुरुस्तीच्या कामांसाठी प्रस्तावित करण्यात आली आहे. शहर उपनगरातील आरोग्य संस्थांच्या स्थापत्यविषयक बळकटीकरणाच्या दृष्टीने २९ रुग्णालये, २७८ आरोग्य केंद्रे-दवाखाने आणि २८ प्रसूतिगृह इ. संरचनात्मक कामे करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याकरिता ८२२.७२ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
सर्व वैद्यकीय महाविद्यालये व प्रमुख रुग्णालयांमधील यंत्रसामग्री दर्जोन्नत करण्यासाठी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात ९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालय, परळचे केईएम रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील बाई यमुनाबाई लक्ष्मणराव नायर धर्मादाय रुग्णालय येथे आधुनिक सिटी स्कॅन सुविधा सुरू करण्यात येणार आहे, त्यासाठी ८ ते १० कोटींचा खर्च करण्यात येईल.
सहा उपनगरीय रुग्णालयांतून मेडिसीन, जनरल सर्जरी, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, बालरोगशास्त्र, ऑर्थोपेडिक्स, ईएनटी, नेत्रशाखा, त्वचा, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजी व पॅथाॅलॉजी या विभागांमध्ये ८६ डी.एन.बी. अभ्यासक्रम सुरू केल्याने १७२ तज्ज्ञ वैद्यकीय शिक्षक आवश्यक असून, त्यामुळे उपनगरीय सेवांचा दर्जा उंचावणार आहे. या डी.एन.बी. अभ्यासक्रमासाठी २०२१-२२ मध्ये २३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय नर्सिंग परिषद यांच्या निर्देशानुसार, महानगरपालिकेने सर्व नर्सिंग स्कूल या महाविद्यालयात परावर्तित करण्यात येणार आहेत. ज्यात बीएससी नर्सिंग हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. नर्सिंग प्राध्यापक संवर्गातील मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी दरवर्षी २० कोटी खर्च होणार आहे.
चौकट
१३ रुग्णालयांमध्ये रुग्णालय नियंत्रण कक्ष
महानगरपालिकेच्या १३ रुग्णालयांमध्ये रुग्णालय नियंत्रण कक्ष प्रस्थापित करण्यात येणार असून, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल झालेल्या आपदग्रस्तांची माहिती मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला उपलब्ध करणे, रुग्णालयात निर्माण होणऱ्या कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या बाबींवर संनियंत्रण व नियंत्रण ठेवणे व संबंधित यंत्रणांना याबाबत अवगत करणे, रुग्णालयाच्या आतील घडणाऱ्या प्रत्येक बाबीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करून निरीक्षण करणे, याकरिता रुग्णालय नियंत्रण कक्ष हे कोणत्याही अंतर्गत किंवा बाह्य आपत्कालीन परिस्थितीत संपर्काचे केंद्र म्हणून कार्यरत असेल.
या रुग्णालयांसाठी भरीव तरतूद
भगवती रुग्णालय पुनर्विकास – ७५ कोटी
शिव रुग्णालय परिसराचा पुनर्विकास - ७५ कोटी
कर्करोग रुग्णालय प्रोटॉन थेरपी - २ कोटी
अग्रवाल रुग्णालयाचा विस्तार - ७५ कोटी
नायर दंत रुग्णालय – ७१.८८ कोटी
गोवंडी शताब्दी रुग्णालयाचा विस्तार - ७५ कोटी
केईएम रुग्णालयात प्लाझ्मा सेंटर - २० कोटी
कुर्ला भाभा रुग्णालयाचा विस्तार -२० कोटी