पायधुनीत ८० लाखांंचे एमडी जप्त

By Admin | Updated: January 9, 2015 01:09 IST2015-01-09T01:09:43+5:302015-01-09T01:09:43+5:30

व्यसनाधीन तरुणांना कमी पैशात जास्त नशा देऊन अगदी थोड्या काळात बळी घेणाऱ्या एमडी हा विषारी पदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त करण्यास पायधुनी पोलिसांना यश आले आहे.

80 lakhs of money was seized | पायधुनीत ८० लाखांंचे एमडी जप्त

पायधुनीत ८० लाखांंचे एमडी जप्त

मनीषा म्हात्रे - मुंबई
व्यसनाधीन तरुणांना कमी पैशात जास्त नशा देऊन अगदी थोड्या काळात बळी घेणाऱ्या एमडी हा विषारी पदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त करण्यास पायधुनी पोलिसांना यश आले आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत केलेली ही सर्वांत मोठी कारवाई असून या कारवाईत तब्बल ८० लाखांचे एमडी (मेटाड्रोन) हा विषारी पदार्थ जप्त करण्यात आला आहे. बाजारात पोहोचण्याआधी हे एमडी जप्त करण्यात आल्यामुळे लाखो तरुणांंचे प्राण वाचले आहेत.
मस्जिद परिसरातील सुरत स्ट्रीटवरून विषारी पदार्थांची तस्करी करण्याप्रकरणी ५ डिसेंबर रोजी पायधुनी पोलिसांनी सलीम मोहम्मद खान या तरुणाला अटक केली होती. या तरुणाकडून पोलिसांनी २५० ग्रॅम एमडी जप्त केले होते. दरम्यान, सलीमने हे एमडी इक्बाल या इसमाकडून घेतल्याची माहिती दिली. आरोपीच्या फक्त नावावरून त्याच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांपुढे आव्हान होते.
मात्र पोलिसांनी इक्बाल या नावाने आरोपीचा शोध सुरू केला. त्याचा शोध घेत असताना मस्जिद बंदर येथील एका झोपड्यात इक्बाल सकाळी ४ ते ५ आणि सायंकाळी ८ ते ९ च्या दरम्यान येत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पायधुनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील कुवळेकर यांंच्या तपास पथकाने बुधवारी रात्री ९ च्या दरम्यान इक्बालच्या घराकडे सापळा रचला.
ठरावीक वेळेनुसार इक्बाल झोपड्यात जाऊन एमडीच्या १
गॅ्रमच्या पुड्या बनवत असताना कुवळेकर यांंच्या पथकाने
इक्बालच्या मुसक्या आवळल्या. इक्बालच्या घेतलेल्या झडतीत एका सिल्वर कोट पिशवीतून पोलिसांनी तब्बल एक किलो एमडी जप्त केले. आणि मेटाड्रोनसारख्या विषारी पदार्थाच्या तस्करीप्रकरणी भादंविच्या ३२८ कलमान्वये पायधुनी पोलिसांनी इक्बालला अटक केली. इक्बाल अब्दुल मेमम ऊर्फ टिकीट ३८ असे आरोपीचे नाव असून आज न्यायालयाने इक्बालला १४ तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.
इक्बाल गेल्या सहा महिन्यांपासून एमडीसारख्या विषारी पदार्थांची तस्करी करत असल्याचे समोर आले. तसेच मस्जिद बंदर येथे अवघ्या २४०० रुपये भाडे देऊन इक्बाल राहण्यास होता. त्यातही नशेच्या आहारी गेलेला इक्बाल यातून मिळणारे पैसे डान्स बारमध्ये उडवीत असल्याचे समोर आले. इक्बालबाबत अधिक तपास सुरू असून त्यांंच्या वडिलांंचा मस्जिद बंदर परिसरात चपलांचे दुकान असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

कॉलेज तरुण लिस्टवर
या विषारी पदार्थांचे तस्करी करण्याचे मुख्य लक्ष हे कॉलेज तरुण आहे. पॉकेटमनीच्या पैशांतून अवघ्या दोनशे रुपयांत हा विषारी पदार्थ उपलब्ध होतो. त्याची नशाही इतर अमली पदार्थांच्या तुलनेत अधिक असते. त्यामुळे हे तस्कर कॉलेज तरुणांना मोक्याच्या ठिकाणी हेरतात. त्यामुळे आता तरुणांना या अमली पदार्थांपासून रोखण्याचे आव्हान यंत्रणांसमोर आहे.

असा चालतो व्यवहार...
इक्बालकडे सापडलेला मेटाड्रोन हा विषारी पदार्थ ओरिजनल असल्याने तो एक ग्रॅममध्ये इतर ४ गॅ्रम पावडरीचे मिश्रण करून प्रत्येकी एक गॅ्रम २०० रुपयांमध्ये विकत होता. एकूणच ओरिजनल १ ग्रॅम मागे त्याला हजार रुपये मिळत होते. एका किलोमागे इक्बालला सुमारे २० लाखांहून अधिक मोबदला मिळत होता.
माझगाव कनेक्शन...
माझगाव येथील एका तस्कराने इक्बालला हा एमडी विकला असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. एमडीची विक्री झाल्यानंतर तीन ते चार दिवसांत त्यातून आलेले ठरावीक पैसे इक्बाल माझगावमध्ये असलेल्या इसमाला द्यायचा. दोघांमध्येही पीसीओवरून संभाषण सुरू असल्याचे समोर आले. त्यामुळे माझगावमधून याचे मोठे रॅकेट ओपन होण्याची शक्यता आहे. पायधुनी पोलिसांनी आता माझगावच्या दिशेने तपास सुरू केला आहे. इक्बालकडून १० हून अधिक मोबाइल जप्त करण्यात आले असून त्याचाही तपशील मागविण्यात आला आहे.
सहा महिन्यांत जातो बळी...
या विषारी पदार्थांचे सेवन करणाऱ्याचे आयुर्मान केवळ सहा महिनेच असते. कारण इतर अमली पदार्थाच्या तुलनेने हे अमली पदार्थ नशा करणाऱ्याला अवघ्या सहा महिन्यांत संपवते. त्यामुळे पोलिसांसाठी अशा प्रकारच्या अमली पदार्थांची तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान आहे.

Web Title: 80 lakhs of money was seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.