आंगणेवाडी भराडी देवीचा ७ फेब्रुवारीला यात्रोत्सव
By Admin | Updated: December 1, 2014 00:04 IST2014-11-30T23:06:54+5:302014-12-01T00:04:32+5:30
नवसाला पावणारी आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आंगणेवाडीतील श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवाची तारीख निश्चितीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे / लक्ष लागून असते.

आंगणेवाडी भराडी देवीचा ७ फेब्रुवारीला यात्रोत्सव
मालवण : लाखो भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीची यात्रा शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०१५ रोजी निश्चित करण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी पारध करण्यात आली होती. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला होता. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या निर्देशानुसार जत्रोत्सवाची तारीख आज, रविवारी सकाळी आठ वाजता निश्चित करण्यात आली आहे.
नवसाला पावणारी आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीतील श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवाची तारीख निश्चितीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे / लक्ष लागून असते. गावातील मुंबईस्थित चाकरमानी तर यात्रेच्या तारखेकडे डोळे लावून असतात. डिसेंबर महिना आला की, कोकणात जत्रोत्सवांचे वेध लागतात. चाकरमानी मित्रमंडळी आपापल्या नातेवाइकांकडे सतत संपर्क ठेवून असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे तिकीट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी होते. यात्रेची तारीख पारध करण्यावर अवलंबून असल्यामुळे दोनच दिवसांपूर्वी यासाठीची पारध करण्यात आली होती. त्यानंतर धार्मिक विधी करत आज सकाळी मंडळाच्यावतीने यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली. दरवर्षी गर्दीचे नवनवे उच्चांक गाठणाऱ्या या यात्रोत्सवात यावर्षीही १० ते १५ लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आंगणेवाडी मंडळ, तसेच जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन लवकरच यात्रा नियोजन करणार आहेत. (प्रतिनिधी)