Join us

प्रभादेवी पूल पाडण्यासाठी ७८ दिवस ब्लॉक; ८०० मेट्रिक टनच्या दोन क्रेनचा होणार वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:02 IST

सुरुवातीला मध्य रेल्वेच्या भागातील पाडकाम होणार असून, त्यानंतर पश्चिम रेल्वेच्या भागातील पाडकाम होणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईतील ११२ वर्षे जुन्या ऐतिहासिक प्रभादेवी पुलाच्या रेल्वेच्या भागातील पाडकामाची तयारी रविवारी रात्रीपासून सुरू करण्यात आली आहे. यासाठी परळकडील दिशेच्या भागात ८०० मेट्रिक टनच्या क्रेन ठेवण्यात आल्या असून, पुढच्या सात दिवसांमध्ये पाडकामाची तयारी पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सुरुवातीला मध्य रेल्वेच्या भागातील पाडकाम होणार असून, त्यानंतर पश्चिम रेल्वेच्या भागातील पाडकाम होणार आहे. याकामासाठी ७८ ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रभादेवी पुलाच्या रेल्वेच्या भागातील पुलाचे पाडकाम आणि बांधकाम कारण्याची जबाबदारी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे ( एमआरआयडीसी) देण्यात आली आहे. तर, पोहच मार्गांचे काम करण्यासाठी खासगी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. पुलाच्या परळ पोहचमार्गाचे पाडकाम पूर्ण झाले असून, प्रभादेवी पोहचमार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, रेल्वे भागातील १३२ मीटर पुलाच्या पाडकामासाठी तयारी सुरू केली आहे.

जानेवारी २०२६ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित

पश्चिम रेल्वेकडून एमआरआयडीसीला लवकरच परवानगी मिळेल. तोपर्यंत  मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या पूर्वेकडील भागाचे पाडकाम सुरू करण्यात येणार आहे. एमआरआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुलाचे रेल्वे भाग पाडण्याचे काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. एक्स्प्रेस आणि लोकल ट्रेनच्या कामकाजात मोठा अडथळा येऊ नये, म्हणून ७८ रेल्वे ब्लॉक आवश्यक असतील. प्रत्येक ब्लॉक कालावधीचे आणि संभाव्य उपनगरीय सेवेतील बदलांचे अचूक वेळापत्रक येत्या आठवड्यात मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून जाहीर केले जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Prabhadevi Bridge Demolition: 78-Day Block, Heavy Cranes to be Used

Web Summary : The 112-year-old Prabhadevi bridge demolition begins, requiring 78 blocks. 800-metric-ton cranes are deployed. Central Railway work starts first, followed by Western Railway. Completion is expected by January 2026, minimizing train disruptions. Detailed block schedules will be released soon.
टॅग्स :मुंबईप्रभादेवी