Join us

पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग दृष्टिक्षेपात; ७६% काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 09:03 IST

मुंबईच्या उपनगरीय नेटवर्कला नवा पर्याय; प्रवासाचा वेळ कमी होणार

मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) हाती घेतलेल्या पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरवर काम वेगाने सुरू असून, प्रकल्पाचे ७६ टक्के काम पूर्ण झाले आहे. ७० किमीपैकी २१ किमी रूळ बसवण्याचे काम पूर्ण झाले असून, ३० किमीपर्यंत बॅलास्ट फॉर्मेशन (खडी पसरवणे) पूर्ण झाले आहे. त्यामुळे मार्ग लवकरच दृष्टिक्षेपात येण्याची शक्यता आहे.

२९.६ किमी लांबीचा हा कॉरिडॉर मुंबईच्या उपनगरीय नेटवर्कला नवा पर्याय उपलब्ध करून देणार आहे. पनवेलमार्गे कर्जत प्रवासाचा कालावधी कमी होणार असून, कल्याणमार्गे होणारी गर्दीही कमी होईल. वाढत्या प्रवासी मागणीला प्रतिसाद देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. हा मार्ग डोंगराळ भागातून जात असल्याने वावरले, नधाळ आणि किरवली असे तीन बोगदे बांधण्यात आले आहेत. त्यांचे खोदकाम पूर्ण झाले असून, ६५ पुलांपैकी ५९ पूल (२९ छोटे आणि ६ मोठे) पूर्ण झाले आहेत. पुणे एक्सप्रेस-वे अंडरपाससाठी गर्डर लाँच करून एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यात आला आहे.

सर्वांत मोठा बोगदा, पूल

हा प्रकल्प मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट - ३ (एमयूटीपी) अंतर्गत २,७८२ कोटी रुपयांच्या खर्चातून पूर्ण केला जात आहे. हा कॉरिडॉर दोन जुन्या स्थानकांना जोडतो, तसेच उपनगरातील सर्वात मोठा बोगदा आणि पूल यामध्ये समाविष्ट आहे. सध्या या जुन्या लाइनवर प्रामुख्याने मालगाड्या आणि लांबपल्ल्याच्या प्रवासी गाड्या धावतात. नवीन दुहेरी मार्गिकेमुळे मुंबई-कर्जतदरम्यान लोकल पनवेलमार्गे धावू शकतील.

असा आहे प्रकल्प 

प्रकल्प खर्च : १२,७८२ कोटी

काम पूर्णत्व : ७६% 

पूल : एकूण ६५ पैकी ५९ पूर्ण

 बॅलास्ट फॉर्मेशन : ७० किमी पैकी ३० किमी

पूर्ण रूळ बसवणे : उसरली-चिखले-मोहोपे-चौकदरम्यान २१ किमी पूर्ण

स्थानके : पनवेल, चिखले, मोहोपे, चौक, कर्जत 

टॅग्स :मुंबईमुंबई लोकल