७४ वर्षीय वृद्धाने सहा जणांना उडवले; एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश
By Admin | Updated: January 10, 2016 20:44 IST2016-01-10T19:49:23+5:302016-01-10T20:44:12+5:30
७४ वर्षीय वृद्धाच्या भरधाव कारच्या धडकेत सहा जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना शनिवारी अंधेरीत घडल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातातील सहाही जण बचावले आहेत.

७४ वर्षीय वृद्धाने सहा जणांना उडवले; एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - ७४ वर्षीय वृद्धाच्या भरधाव कारच्या धडकेत सहा जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना शनिवारी अंधेरीत घडल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातातील सहाही जण बचावले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. श्रीपद पंजाबी असे या ह्यप्रतापीह्ण वृद्धाचे नाव असून अंधेरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
अंधेरी परिसरात राहत असलेला पंजाबी हा एका खासगी कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी आहे. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास येथील तेली गल्लीतून टोयोटा कारमधून भरधाव वेगाने जात असताना त्याचा कारवरचा ताबा सुटला. तेव्हा रिक्षाची वाट बघत असलेल्या कुटुंबियांतील चौघांसह रस्त्यातील दोन पादचा:यांना चिरडून पुढे जात त्याच्या कारने लोखंडी खांबाला धडक दिली. घटनास्थळाहून पळ काढत असताना स्थानिकांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. स्थानिकांकडून माहिती मिळताच अंधेरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. जखमी झालेले गुप्ता कुटुंब मरोळ येथील रहिवासी आहेत. यामध्ये धनजी गुप्ता (३८), गीता धनजी गुप्ता (३७) आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. त्यांच्यासह धर्मेद्र पांडे आणि विनय पांडेही हे पादचारीही अपघातात जखमी झाले. घरी जाण्यासाठी ते रिक्षाची वाट पाहत असताना पंजाबीच्या कारने त्यांना धडक दिली. यामध्ये पंजाबीही जखमी झाला आहे. त्याच्यावरही उपचार सुरु असल्याने अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. पंजाबी विरोधात हिट अॅण्ड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर जवळकर यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.