७२ वर्षांच्या शेतकऱ्याचा लोकहित लढा
By Admin | Updated: January 9, 2015 22:53 IST2015-01-09T22:53:48+5:302015-01-09T22:53:48+5:30
गेल्या सहा वर्षांपासून ७२ वर्षांच्या शेतकऱ्याचा लढा सुरू असून शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेने हे अतिक्रमण आजतागायत हटवलेले नाही.

७२ वर्षांच्या शेतकऱ्याचा लोकहित लढा
भिवंडी : तालुक्यात कुरुंद गावातील गुरचरण जमिनीवर दोन पक्क्या बांधकामांचे झालेले अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून ७२ वर्षांच्या शेतकऱ्याचा लढा सुरू असून शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेने हे अतिक्रमण आजतागायत हटवलेले नाही.
तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत कुरुंदच्या हद्दीतील सागरनगर (दाता), लक्ष्मण रामा भोईर यांच्या घरासमोर सर्व्हे क्र.२४/१अ गुरचरण जागेत सन २००८ मध्ये नऊ खोल्यांसाठी दोन घरांचे पक्के पाये बांधले आहेत. गावाच्या तसेच शासनाच्या जागेत अतिक्रमण करून केलेले बांधकाम तोडण्यासाठी गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रामू जगू पाटील यांनी गेल्या ६ वर्षांत तलाठी, तहसील, प्रांत अधिकारी, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लेखी अर्ज देऊन हे विनापरवाना अतिक्रमण केलेले पक्क्या पायांचे बांधकाम तोडण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
४या शासकीय अधिकाऱ्यांनी त्या पक्क्या बांधकामांचा मालक शोधला नाही की, ते बांधकाम तोडण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे सरकारी जागांवर शासकीय संबंधित कर्मचाऱ्यांचे लक्ष नसल्याचे स्पष्ट होत आहे.
४शासनाच्या गुरचरण जागेचे संरक्षण व्हावे व सदर बेवारस बांधकाम तोडावे, यासाठी ७२ वर्षांचे रामू जगू पाटील हे एकाकी शिलेदारासारखे लढत आहेत. पाटील यांनी गावातील तंटा मिटवून ३ लाखांचे बक्षीस कुरुंद ग्रामपंचायतीस मिळवून दिले आहे.
४यापूर्वी गुरचरण जागेत बांधलेले अतिक्रमण सरकारी कर्मचाऱ्यांमार्फत पाडले आहे. मात्र, हे दोन बेवारस पक्के बांधकाम तोडण्यासाठी सरकारी कार्यालयामार्फत दिरंगाई होत आहे. हे बांधकाम तोडावयाचे नसल्यास ही जागा शासनाने पंचनामा करून ताब्यात घ्यावी व त्या जागेवर महिलागृह, तलाठी कार्यालय, शैक्षणिक उपक्रम अथवा बचत गटांसाठी उपयोगात आणावी, असे लेखी पत्र रामू पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.