Join us  

गिरगावात साकारली ७ हजार चौरस फूट महारांगोळीतून अभिनंदनच्या शौर्याची गाथा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 4:33 PM

रंगशारदाचे प्रसाद मुंढे आणि स्वास्थ्यरंगचे डॉ. तेजस लोखंडे यांच्या सहकार्याने ‘ज्योतीने तेजाची आरती’ या यात्रेच्या संकल्पनेवर आधारित ७००० चौरस फूटाची महारांगोळी गिरगावात साकारण्यात आली आहे. 

मुंबई - दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याच्या उत्साहाचा क्षण साजरा करण्यासाठी गिरगावकर मंडळी सज्ज झाली आहेत. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानकडून गिरगावातील गणेश मंदिरापासून निघणारी ‘हिंदू नववर्ष स्वागत यात्रा’ मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. यंदा यात्रेचे १७ वे वर्ष आहे. या वर्षीची हिंदू यात्रा ‘ज्योतीने तेजाची आरती’ या संकल्पनेवर आधारित आहे.

हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने प्रतिष्ठानतर्फे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मागील वर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे महारांगोळीचे आयोजन करण्यात आले आहे. रंगशारदाचे प्रसाद मुंढे आणि स्वास्थ्यरंगचे डॉ. तेजस लोखंडे यांच्या सहकार्याने ‘ज्योतीने तेजाची आरती’ या यात्रेच्या संकल्पनेवर आधारित ७००० चौरस फूटाची महारांगोळी गिरगावात साकारण्यात आली आहे. 

या महारांगोळीकरिता २०० किलो रांगोळी आणि ६०० किलो रंग वापरले आहेत. रंगशारदा आणि स्वास्थ्यरंगच्या २५ कलाकारांतर्फे ७ तासांच्या अथक प्रयत्नांतून ही  महारांगोळी साकारण्यात आली. पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशदवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या वायू दलाच्या एअरस्ट्राईकला मानवंदना या रंगोळीमधून देण्यात आली आहे. पाकिस्तानने पकडलेले हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान  यांच्या शौर्याची  गाथा रांगोळीच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे.

गिरगांवच्या महारांगोळीचे प्रदर्शन शुक्रवार २९ मार्च २०१९ व शनिवार ३० मार्च, २०१९ रोजी सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत माधवबाग पटांगण, सी. पी. टँक येथे ही रांगोळी मुंबईकरांना पाहता येणार आहे. तसेच मुंबईकरांनी मोठ्या संख्येने महारांगोळी पाहण्यास यावे तसेच गुढी पाडव्याच्या शुभदिनी गिरगांवच्या पाडव्यात सहभागी व्हावे असे आवाहन स्वागत समितीचे अध्यक्ष शैलेश रायचुरा, स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुजित मोरे, यात्रा प्रमुख तनय वैद्य यांनी केले आहे. 

टॅग्स :मुंबईरांगोळीअभिनंदन वर्धमानगुढी पाडवा