Join us

मतदानासाठी ७० हजार कर्मचारी; पालिका निवडणुकीसाठी आणखी १,१०० बूथ : ६ ऑक्टोबरला मतदार यादी जाहीर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 11:37 IST

वॉर्ड क्रमांक ९५ व ९६ : जवळपास १,४०० कुटुंबांची नावे वॉर्ड ९५ ऐवजी ९६ मध्ये हलवण्यात आल्याने नाराजी व्यक्त झाली. वांद्रे खेरवाडीतील सुमारे ८० जणांनी त्यांना पुन्हा वॉर्ड ९५ मध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी वेगाने सुरू झाली असून जानेवारीअखेरपर्यंत निवडणूक होण्याची शक्यता आहे. यासाठी महापालिकेकडून सर्व पातळ्यांवर नियोजन सुरू असून मतदानाच्या दिवशी जवळपास ७० हजार कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय पोलिंग मॅनेजमेंटसाठी साडेतीन हजार कर्मचारी असतील. सध्या ५०० पोलिंग मॅनेटमेंट कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.

निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. त्यावर ४९४ सूचना व हरकती प्राप्त झाल्या होत्या. राज्य सरकारकडून नियुक्त केलेले  अपर मुख्य सचिव (गृह) इकबालसिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणीत ३३७ हरकतींचा निपटारा करण्यात आला. ६ ऑक्टोबरला वॉर्ड रचना अंतिम अहवाल आणि मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.  अंतिम मंजुरीनंतर आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

स्थानिकांच्या हरकती

वॉर्ड क्रमांक ९५ व ९६ : जवळपास १,४०० कुटुंबांची नावे वॉर्ड ९५ ऐवजी ९६ मध्ये हलवण्यात आल्याने नाराजी व्यक्त झाली. वांद्रे खेरवाडीतील सुमारे ८० जणांनी त्यांना पुन्हा वॉर्ड ९५ मध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

वॉर्ड क्रमांक १६९ व १७० 

उद्धवसेनेच्या नगरसेविका प्रवीणा मोरजकर यांनी तसेच २५० नागरिकांनी हरकत नोंदवली होती. रजा मार्ग, कुर्ला कदम सोसायटी, शमीम टॉवर, एमएमसेल बिल्डिंग, एसआरए कॉलनी, बुद्ध विहार आदी भाग वॉर्ड १७० मध्ये टाकल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. या भागात एकूण ३ हजार मतदार असून त्यापैकी साधारण १,५०० जण मतदान करतात.

मागील विधानसभा निवडणुकांत प्रत्येक बूथवर मतदार १,२०० ते १,४०० होते. मात्र, पालिका निवडणुकीसाठी प्रत्येक बूथवरची मतदार संख्या १,१०० ते १,२०० इतकी ठेवण्यात येणार आहे. 

यामुळे एकूण बूथची संख्या १० टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. १०,१११ वरून बूथसंख्या थेट ११,२२२ इतकी होणार आहे. पालिका निवडणुकीच्या व्यवस्थापनासाठी ४,००० कर्मचारी आधीच नियुक्त केले आहेत.

 मतदानाच्या दिवशी प्रत्येक बूथवर ५ अधिकारी आणि १ राखीव कर्मचारी म्हणजे एकूण ६ मतदान कर्मचारी असतील. त्यामुळे एकूण ७० हजार कर्मचारी तैनात होणार आहेत.

टॅग्स :मुंबई