पालिकेचा वकिलांवर ७९ लाख खर्च!
By Admin | Updated: May 28, 2014 01:25 IST2014-05-28T01:25:14+5:302014-05-28T01:25:14+5:30
वादग्रस्त कॅम्पाकोला इमारतीच्या खटल्यादरम्यान न्यायालयात महापालिकेची बाजू मांडलेल्या ४ वकिलांवर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने तब्बल ७९.६३ लाख रुपये एवढा खर्च केला आहे

पालिकेचा वकिलांवर ७९ लाख खर्च!
मुंबई : वादग्रस्त कॅम्पाकोला इमारतीच्या खटल्यादरम्यान न्यायालयात महापालिकेची बाजू मांडलेल्या ४ वकिलांवर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने तब्बल ७९.६३ लाख रुपये एवढा खर्च केला आहे. कॅम्पाकोला इमारतीच्या बेकायदा मजल्यांवरील रहिवाशांनी ३१ मेपर्यंत आपल्या घराच्या चाव्या पालिका प्रशासनाला सुपुर्द कराव्यात, असे म्हणत पालिकेने रहिवाशांना नोटीस बजावली असतानाच माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकारान्वये प्राप्त झालेल्या कागदपत्रांतून ही बाब समोर आली आहे. गलगली यांनी पालिका प्रशासनाकडे कॅम्पाकोला प्रकरणातील वास्तुविशारद आणि वकिलांवर केलेल्या खर्चाची माहिती मागितली होती. इमारत प्रस्ताव खात्याने राजा अडेरी आणि अन्य वास्तुविशारदाची माहिती देताना हा अर्ज विधी खात्याकडे हस्तांतरित केला. विधी खात्याचे जन माहिती अधिकारी आणि उपकायदा अधिकारी पी. नाईक यांनी गलगली यांना दिलेल्या माहितीनुसार, पालिकेने ४ वकिलांवर एकूण ७९ लाख ६३ हजार रुपये खर्च केले आहेत. यामध्ये सर्वाधिक रक्कम ही माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ सल्लागार गुलाम वहानवटी यांना देण्यात आली असून, ती ५७ लाख ७५ हजार एवढी आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात पालिकेची बाजू मांडली आहे; शिवाय त्यांना मदत करणारे सल्लागार पल्लव सिसोदिया यांनाही १९ लाख ३ हजार रुपये अदा करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)