Join us

पुण्यातील महाविद्यालयात प्रवेशासाठी उकळले सव्वाकोटी ; अधिष्ठातांच्या नावाने बनावट प्रमाणपत्र, ओळखपत्र, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 06:09 IST

पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमडी (रेडिएशन) पदवीसाठी प्रवेश देण्याच्या बहाण्याने चौघांनी कांदिवलीतील व्यावसायिकाकडून सव्वाकोटी उकळले.

मुंबई : पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमडी (रेडिएशन) पदवीसाठी प्रवेश देण्याच्या बहाण्याने चौघांनी कांदिवलीतील व्यावसायिकाकडून सव्वाकोटी उकळले. पाठपुरावा करून काही पैसे परत दिले. मात्र, उर्वरित ८१ लाख ४४ हजार रुपये परत न केल्याने व्यावसायिकाने बोरिवली पोलिसांत धाव घेतली. आरोपींनी महाविद्यालयाच्या अधिष्ठातांच्या नावाने बनावट प्रमाणपत्र, ओळखपत्र दाखवून पैसे घेऊन बनावट पावती दिल्याचा आरोप आहे.

कांदिवली परिसरात राहणाऱ्या तक्रारदाराचा मुलगा २०१९ मध्ये एमबीबीएस उत्तीर्ण झाला. एमडी पात्रतेसाठी तो नीट परीक्षेला बसला आणि १९९ गुण मिळवले. चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळत नसल्याने त्याच्या वडिलांनी व्यवस्थापन कोट्यातून महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी धडपड सुरू केली. २०२२ मध्ये तक्रारदार व्यावसायिकाने आरोपी संदीप वाघमारे याच्याशी अखिलेश या मित्राद्वारे भेट घेतली. वाघमारेने तक्रारदाराला औरंगाबादच्या महाविद्यालयात एनआरआय कोट्यातून प्रवेशाचे काम करून देण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर तक्रारदारांचा मुलगा  औरंगाबादला गेला. वाघमारे यांनी तक्रारदाराची ओळख अभिजित पाटील व अनिल तांबट यांच्याशी करून दिली. तांबट यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशाचे काम शासकीय कोट्यातून करून देण्याचे आश्वासन दिले. तांबट यांनी तक्रारदाराच्या मुलाला काही कागदोपत्री प्रक्रिया करायला लावली.

१० जुलै रोजी तक्रारदाराच्या मुलाला बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथे यशस्वीपणे प्रवेश घेतल्याचा ईमेल आला. पुढे, प्रवेश प्रक्रियेसाठी १ कोटी ७० लाख रुपये खर्च सांगितला. आरोपीच्या सांगण्यावरून तक्रारदाराने  एक कोटी १६ लाख रुपये भरले होते.

. ..अन् सतर्क झाले 

 अभिजित पाटील याने एका विद्यार्थ्याला ओळखपत्र आणि अधिष्ठातांच्या नावाचे पत्र दिले होते. काही दिवसांनंतर, तक्रारदाराला त्याच्या मित्राकडून तांबट हा फसवणूक करणारा आहे आणि प्रवेश देण्याच्या बहाण्याने लोकांना फसवतो, असे कळताच त्यांना धक्का बसला.

 या मित्राचा मुलाकडूनही प्रवेशासाठी तांबटने मोठी रक्कम घेतल्याचे समजताच त्यांनी पैसे परत करण्यासाठी तगादा लावला, तसेच चौकशीत कागदपत्रेही बनावट असल्याचे समोर आले. अखेर, आरोपीने ५४ लाख रुपये परत केले. उर्वरित रक्कम न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.