Join us

६५ वर्षात... २६८ पुराच्या घटनांत ६९ हजार जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 02:11 IST

१९५० ते २०१५ पर्यंतच्या घटना

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मुंबई शहर आणि उपनगरात सातत्याने पुराच्या घटना घडत असून, बुधवारी पडलेल्या पावसाने तर दक्षिण मुंबईला जणू काही धडकीच भरविली. विशेषत: समुद्राचे पाणी गिरगावात शिरल्यानंतर आणि पावसाचे पाणी गिरगावात भरल्यानंतर लोकांचे हाल झाल्याने आता पुन्हा एकदा यंत्रणा खडबडून जागी झाली असतानाच १९५0 ते २0१५ या कालावधीत भारतात तब्बल २६८ एवढ्या पुराच्या घटनांची नोंद झाली आहे.

भारतामधील ८२५ दशलक्ष नागरिकांना याचा फटका बसला आहे. तर १७ दशलक्ष नागरिक बेघर झाले आहेत. सुमारे ६९ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्वामुळे झालेले हे नुकसान ६० अब्ज यूएस डॉलर एवढे आहे. आता तर प्रत्येक वर्षी पुरामुळे होणारे नुकसान वाढतच असून, गेल्या दहा वर्षांत हे प्रमाण अधिक वाढले आहे. हा आकडा प्रत्येक वर्षी ३ अब्ज यूएस डॉलर एवढा आहे. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, आसाम, पश्चिम घाट, गोवा, उत्तर कर्नाटक, दक्षिण केरळ येथे पुरांनी थैमान घातले आहे.

जून २०२० पर्यंत २०० हून अधिक आपत्कालीन घटना जगभरात घडल्या असून, २०१९ सालच्या तुलनेत हे प्रमाण २७ टक्के अधिक आहे. दुर्दैव म्हणजे २०२० मध्ये घडत असलेल्या आपत्कालीन घटनांमध्ये सुमारे ५ लाख ६१ हजार ८८१ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आणि यातील ९५ टक्क्यांहून अधिक नुकसान हे हवामानाशी संबंधित आपत्कालीन घटनांमुळे झाले आहे. २०२० सालातील पहिल्या सहा महिन्यांत म्हणजे जानेवारी ते जूनदरम्यान जगभरात २०७ आपत्कालीन घटना नोंदविण्यात आल्या आहेत.यात सर्वाधिक नुकसान अम्फान या चक्रीवादळामुळे झाले आहे. हे आर्थिक नुकसान अंदाजे १ लाख १२ हजार ३७६ कोटी रु पये असावे, असा अंदाज बांधला जात आहे, असा ग्लोबल कॅटास्ट्रोफ रिकॅप : फर्स्ट हाफ आॅफ २०२० हा अहवाल म्हणतो. 

टॅग्स :मुंबईपूर