मृत शिक्षकांचे ६८५ कुटुंबीय मदतीच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: February 5, 2015 00:50 IST2015-02-05T00:50:20+5:302015-02-05T00:50:20+5:30
सेवेत असताना मृत्यू झालेल्या राज्यातील ६८५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून देय असलेली मदत अद्याप मिळालेली नाही.

मृत शिक्षकांचे ६८५ कुटुंबीय मदतीच्या प्रतीक्षेत
मुंबई : सेवेत असताना मृत्यू झालेल्या राज्यातील ६८५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून देय असलेली मदत अद्याप मिळालेली नाही. सुमारे पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही मदत पदरी पडत नसल्याने मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने कुटुंबीयांना तातडीने मदत न दिल्यास २ मार्चपासून भिख मांगो आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी दिला आहे.
अनुदानित संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना सुमारे ६० हजार रुपयांची विशेष आर्थिक मदत दिली जाते. परंतु वित्त विभागाकडून यासाठी योग्य प्रमाणात तरतूद केली नसल्याने राज्यातील मयत झालेल्या शेकडो शिक्षक व शिक्षकेतरांचे कुटुंबीय लाभापासून वंचित आहेत.
रायगड जिल्ह्यातील २५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाला आहे. तर जळगावमधील ५०, रत्नागिरी जिल्ह्यात ८, ठाणे जिल्ह्यात ७ असे राज्यात सुमारे ६८५ मृत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेवेत असताना मृत्युमुखी झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळणे अपेक्षित होते. मात्र ते गेल्या पाच वर्षांपासून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाच्या उदासीनतेमुळे व असंवेदनशीलतेमुळे मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना मदत मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे मृत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत देण्यात यावी, अन्यथा २ मार्चपासून मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना सोबत घेऊन राज्यभर भिख मांगो आंदोलन करण्याचा इशारा मोते यांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाद्वारे दिला आहे. (प्र्रतिनिधी)