सातारच्या जिलेबीला ६८ वर्षे स्वातंत्र्यदिनाचा आनंदोत्सव :
By Admin | Updated: August 15, 2014 00:20 IST2014-08-14T23:45:04+5:302014-08-15T00:20:21+5:30
तोंड गोड करून आनंद साजरा करण्याची अनोखी परंपरा

सातारच्या जिलेबीला ६८ वर्षे स्वातंत्र्यदिनाचा आनंदोत्सव :
सातारा : देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि स्वातंत्र्यवीरांचा जिल्हा असणाऱ्या साताऱ्यातील कृष्णा सीताराम राऊत यांना अत्यंत आनंद झाला. कृष्णाशेठ यांनी तब्बल ११ किलो जिलेबी वाटली आणि स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद साजरा केला. त्यांनी सुरू केलेली ही परंपरा सातारकरांनी अजूनही कायम ठेवली आहे. सातारा शहरात स्वातंत्र्यदिना दिवशी परस्परांना जिलेबी देण्याची पद्धत आहे. ही अनोखी पद्धत साताऱ्यात सुरू करण्याचे श्रेय कृष्णा राऊत यांना जाते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वाटलेली जिलेबी सातारकरांच्या लक्षात राहिली. पुढच्यावर्षीही लोकांनी ‘यंदा जिलेबी नाही का?’ अशी विचारणा केली. त्यावर्षीही राऊतांनी जिलेबी वाटली आणि पुढे ६८ वर्षे सातारकरांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली आहे. पूर्वी केवळ रिफाईन्ड तेलातील जिलेबी उपलब्ध होती. आता जसा काळ बदललाय तसं त्यात वनस्पती आणि साजुक तुपातील जिलेबींना ग्राहक पसंती देत आहेत. अजूनही रिफाईन्ड तेलातील जिलेबीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. जिलेबीमध्ये डॉलर जिलेबी, केशर, दूध, वेलची जिलेबी व रसभर जिलेबी असे काही प्रमुख प्रकार आहेत. जिलेबी किंवा पाक तयार करताना लाकडाचा वापर केला तर त्याचा स्वाद अधिक खुलतो. (प्रतिनिधी) ‘खंबीर’ महत्त्वाचे जिलेबीचे पीठ साधारण एक आठवडा आधी भिजवले जाते. कोमट पाणी, दही आणि उच्च प्रतीचा मैदा असं एकत्र करून दह्याच्या मुरवणाप्रमाणे हे मित्रण भिजवून ठेवावे लागते. याला ‘खंबीर लावणं’ असं म्हणतात. खंबीर उठणं आणि खंबीर बसणं यावर जिलेबीची चव आणि आकार अवलंबून असतो. खंबीर नीट जमलं नाही तर जिलेबी कडे धरत नाही किंवा साखरेचे पाणी शोषून घेत नाही. जिलेबी करताना ८५ टक्के खंबीर आणि १५ टक्के मैदा एकत्र केले जाते.
सातारकरांनी ६८ वर्षांपासून जिलेबी वाटपाची परंपरा अबाधित ठेवली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या आधी एक आठवडा आम्हाला याची तयारी करून ठेवावी लागती. जिलेबीचं पीठ जेवढं मुरतं तितकी छान चव जिलेबीला येते. रुचकर, स्वादिष्ट जिलेबीसाठी नेहमीच आमचे प्रयत्न असतात. - भारतशेठ राऊत
बचतगटांना आधार स्वातंत्र्यदिनी जिलेबी वाटण्याचा कार्यक्रम सर्वत्र होत असल्यामुळे अनेक बचतगटांना या निमित्ताने रोजगार मिळाला आहे. शहरातील विविध दुकानांमध्ये जिलेबी तयार करण्याचे प्रशिक्षण घेऊन बचतगटातील सदस्य जिलेबीचा स्टॉल सुरू करत आहेत.