Join us

कॅनडातील ६८ वर्षीय व्यक्तीला मुंबईत जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 18:39 IST

स्वाईन फ्लूची लागण झालेल्या एका ६८ वर्षीय कॅनेडियन रूग्णाचे परळ येथील ग्लोबल रूग्णालयातील डॉक्टरांनी प्राण वाचवले आहे.

मुंबई : स्वाईन फ्लूची लागण झालेल्या एका ६८ वर्षीय कॅनेडियन रूग्णाचे परळ येथील ग्लोबल रूग्णालयातील डॉक्टरांनी प्राण वाचवले आहे. ही व्यक्ती गेल्या दिवसांपासून ‘अँक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम’ (एआरडीएस) म्हणजेच तीव्र श्वसनाच्या विकाराने त्रस्त होती. आठ आठवडे त्यांच्यावर रूग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा दिसू लागल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. वखारिया असे या रूग्णाचे नाव असून ते कॅनडामध्ये राहणारे आहेत. अनेक वर्षांपासून ते मधुमेह आणि उच्च रक्तदाब या विकाराने पिडीत आहेत.फेब्रुवारी २०२० मध्ये वखारिया पत्नीसह सुट्टी असल्याने मुंबईत फिरायला आले होते. त्यानंतर ते मार्चमध्ये कर्नाटकमध्ये कुर्ग या शहरात राहिले. काही हिल स्टेशनला भेट दिल्यानंतर ते पुन्हा मुंबईत परतले. मात्र, मुंबईत आल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली. कोविड-19 ची लक्षणे दिसू लागल्याने वैद्यकीय चाचणी सुद्धा करण्यात आली. परंतु, वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना तातडीने मुंबईतील ग्लोबल रूग्णालयात हलवण्यात आले. या रूग्णालयात वैद्यकीय चाचणी अहवालात रूग्णाला एच२एन३ म्हणजे स्वाईन फ्लू असल्याचे निदान झाले. या आजारामुळे रूग्णाचे अन्य अवयव निकामी होऊ लागले होते. अशा स्थितीत डॉक्टरांनी हेमोडायलिसिस सुरू करून रूग्णाचे प्राण वाचवले आहे, असे ग्लोबल रूग्णालयातील क्रिटिकल केअर युनिटचे डॉ. प्रशांत बोराडे आणि ग्लोबल रूग्णालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक तलावळीकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :वैद्यकीयमुंबई