Join us  

खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 6:04 AM

आचारसंहिता भरारी पथक आणि स्टॅटिक सर्व्हेलियन्स पथकाकडून बेहिशेबी रोकड बाळगणाऱ्यांची तपासणी सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत कार्यरत असलेल्या आचारसंहिता भरारी पथक आणि स्टॅटिक सर्व्हेलियन्स पथकाने मिळून ६६ लाख ४५ हजार ३९० रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. तर, ५१ लाख ७५ हजारांची रोकड आचारसंहिता भरारी पथकाने पकडली आहे, अशी माहिती सहायक  निवडणूक निर्णय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी दिली.

वांद्रे पूर्वेतील सरकारी वसाहतीत वांद्रे पूर्व विधानसभा निवडणूक मतदान केंद्र कार्यालय आहे. या केंद्राअंतर्गत आचारसंहिता भरारी पथक आणि स्टॅटिक सर्व्हेलियन्स पथकाकडून बेहिशेबी रोकड बाळगणाऱ्यांची तपासणी सुरू आहे. त्यात आचारसंहिता भरारी पथकाने खेरवाडी येथे एका वाहनाची तपासणी केली असता त्यात ५१ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम आढळली. या प्रकरणी निर्मलनगर पोलिस ठाण्यात जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच स्टॅटिक सर्व्हेलियन्स पथकाकडून खार, वांद्रे, वाकोला परिसरातून १० लाख ९२ हजर ३१० रुपयांची रोकड जप्त केली असून, एक लाख ६९ हजार आणि ३ सोन्याची नाणी आणि दोन लाख नऊ हजार असा मिळून १४ लाख ७० हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शिवसेना कार्यकर्त्या विरोधात तक्रार

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांचे चिरंजीव खार येथील अनियोग शाळेत प्रचारासाठी आले असता निवडणूक व्हिडीओ सर्व्हेलियन्स टीमला मज्जाव केल्याप्रकरणी शिवसेनेचा कार्यकर्ता संजय लोखंडे याच्याविरोधात निर्मलनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. 

 

टॅग्स :गुन्हेगारी