Join us

कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 17:49 IST

मुंबईतील एका कुटुंबातील आजी आणि नातवाने सोबतच दहावीची परीक्षा दिली होती. नातवाहसह आजीदेखील चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या वर्षीही राज्यात मुलींनीच बाजी मारली आहे. निकालात कोकण पुन्हा 'नंबर वन' आहे. दहावीचा राज्याचा निकाल ९४.१० टक्के एवढा लागला आहे. चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यात येत आहे. याच दरम्यान एक जबरदस्त घटना समोर आली आहे. दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र पास झाले आहेत. 

मुंबईतील एका कुटुंबातील आजी आणि नातवाने सोबतच दहावीची परीक्षा दिली होती. नातवाहसह आजीदेखील चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. ६५ वर्षीय आजीचं नाव प्रभादेवी असून त्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यांना ५२ टक्के गुण मिळाले आहेत. तर नातू सोहमला ८२ टक्के मिळाले आहेत. यामुळे कुटुंबीयांना दुप्पट आनंद झाला आहे. 

"मी मराठी मीडियममधून पास झाले आणि माझा नातू इंग्रजी मीडियममधून पास झाला आहे. मी पास झाले आणि नातूही पास झाला त्यामुळे छान वाटलं. माझं एवढं वय असूनही मी जेव्हा परीक्षा द्यायला गेले तेव्हा मला सर्वांनीच मदत केली. माझ्या मोठ्या नातवाला पाहून मला वाटलं की आपण पण शिकावं. लग्नानंतर पुढचं शिक्षण घेणं राहून गेलं" असं आजीने म्हटलं आहे. 

या वर्षी दहावीच्या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५८,०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.यापैकी १५,४६,५७९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,५५,४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४,८८,७४५ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ४,९७,२७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३,६०,६३० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, १,०८,७८१ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 

टॅग्स :दहावीचा निकालमुंबई