Join us  

मुंबईत तब्बल ७५ रिक्षांची चोरी करणाऱ्याला अटक, चोरीची मोडस ऑपरेंडी पाहून पोलिसही चक्रावले  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 1:58 PM

मुंबईत एका ६१ वर्षीय वृद्ध व्यक्तीला आणि त्याच्या ३७ वर्षीय साथीदाराला तब्बल ७५ रिक्षा चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

मुंबईत एका ६१ वर्षीय वृद्ध व्यक्तीला आणि त्याच्या ३७ वर्षीय साथीदाराला तब्बल ७५ रिक्षा चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. २०१९ सालापासून हे दोघं रिक्षा चोरी करून त्या भाडेतत्वावर इतरांना चालवायला देऊन लाखो रुपयांची कमाई करत असल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. 

किंगपिन मुन्तियाज शेख (६१) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो मुंबईतील पवई परिसरातील रहिवाशी आहे. त्याचा साथीदार खुशनूर खान (३७) यालाही अटक करण्यात आली आहे. दिंडोशी येथील एका शाळेबाहेर उभी केलेली रिक्षा नेण्यासाठी दोघं आरोपी आले असता मुंबई पोलिसांनी त्यांनी अटक केली आहे. 

चोरी नेमकी कशी करायचे?खुशनूर खान त्याच्याजवळ असलेला स्टार्टर प्लग रिक्षाच्या इंजिनला जोडून ती सुरू करण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली. यावेळी मुन्तियाज शेख रिक्षात मागे बसला होता. दोघंही रिक्षात असलेला कंपनी फिटेट स्टार्टर प्लगचा सील तोडून रिक्षाची चोरी करत असल्याचं उघडकीस आलं आहे. 

७५ रिक्षांची चोरी कशी उघडकीस आली?पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी शेख आणि खान यांचे व्हॉट्सअॅप चॅट तपासले. यात दोघांनी आतापर्यंत ७५ ऑटोरिक्षा चोरी केल्याचं संभाषण केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातून दोघांनी रिक्षा चोरी केल्या आहेत. रिक्षा चोरी केल्यानंतर मुन्तियाज शेख तिचं रजिस्ट्रेशन आणि इंजिन बदलून टाकायचा त्यामुळे आजवर या चोऱ्या उघडकीस येत नव्हत्या. "बँकेकडून कर्ज काढून घेतलेल्या रिक्षा हफ्ते न पूर्ण केल्यामुळे लिलावात काढल्या जातात. या लिलाव प्रक्रियांमध्ये दोघं आरोपी सामील होऊन बँकेच्या एजंटकडून या रिक्षा खरेदी करत असतं. अशापद्धतीनं दोघांनीही रिकव्हरी एजंटचा विश्वास जिंकला होता. त्याच जोरावर दोघं बँकेचं कर्ज असलेल्या रिक्षांबाबतची माहिती मिळवायचे", असं पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी सांगितलं. 

एका रिक्षा चोरी प्रकरणात चौकशी करत असताना अंधेरी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बेलगे, पोलीस अधिकारी शिवाजी पावडे, उपनिरीक्षक दिगंबर पगार आणि डिटेक्शन स्टाफ यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना मुन्तियाज शेख आणि खुशनूर खान यांची ओळख पटवली. बेलगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांकडून आतापर्यंत तब्बल ७८ लाख किमतीच्या ४० ऑटोरिक्षा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या रिक्षा दोघं वसई आणि पालघर येथील गॅरेजमध्ये ठेवत असत. याच ठिकाणी रिक्षाचं इंजिन आणि चेसी नंबर बदलला जायचा.  

टॅग्स :ऑटो रिक्षाचोरीगुन्हेगारीमुंबई