पश्चिम उपनगरांतील रस्त्यांसाठी सहाशे कोटी
By Admin | Updated: February 10, 2015 00:20 IST2015-02-10T00:20:07+5:302015-02-10T00:20:07+5:30
जकात उत्पन्न रद्द झाल्यास रस्ते प्रकल्पाला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत़ त्यामुळे चकाचक रस्त्यांच्या आराखड्याच्या शेवटच्या

पश्चिम उपनगरांतील रस्त्यांसाठी सहाशे कोटी
मुंबई : जकात उत्पन्न रद्द झाल्यास रस्ते प्रकल्पाला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत़ त्यामुळे चकाचक रस्त्यांच्या आराखड्याच्या शेवटच्या वर्षात रस्त्यांसाठी पालिकेच्या तिजोरीचे द्वारच प्रशासनाने उघडले आहे़ त्यानुसार अर्थसंकल्पात रस्त्यांसाठी मोठा वाटा राखून ठेवल्यानंतर आता पश्चिम उपनगरांतील रस्त्यांसाठी सहाशे कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर आणण्यात आला आहे़
खड्डेमुक्त मुंबईसाठी पालिकेने २०१३ ते २०१६ या तीन वर्षांचा आराखडा तयार केला आहे़ त्यानुसार पुढचे वर्ष हे या आराखड्यानुसार शेवटचे वर्ष असल्याने पालिकेने रस्त्यांची कामे घाईघाईने उरकण्यास सुरुवात केली आहे़ २०१६ पासून जकात उत्पन्न बंद झाल्यास रस्त्यांची कामं रखडतील़ त्यामुळे सिमेंट काँक्रिटीकरणाचे प्रकल्प या वर्षभरात मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येत आहेत़ आगामी अर्थसंकल्पातही रस्ते विभागाने मोठा वाटा मिळवला आहे़
गतवर्षीच्या तुलनेत एक हजार कोटी रुपये वाढवून तब्बल ३८०० कोटींची तरतूद रस्त्यांच्या कामांसाठी करण्यात आली आहे़ त्यानुसार पश्चिम उपनगरांतील अंधेरी, गोरेगाव, मालाड येथील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे़ यासाठी सुमारे सहाशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे़ हा प्रस्ताव येत्या बुधवारी स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी येणार आहे़ (प्रतिनिधी)