६० टक्के महिलांना नात्यातूनच होतो त्रास
By Admin | Updated: June 29, 2015 05:54 IST2015-06-29T05:54:46+5:302015-06-29T05:54:46+5:30
गतिमान झालेल्या जीवनाबरोबर पाश्चात्त्य संस्कृतीच्या मूल्यांचा परिणामही समाजावर होत आहे़ पण दुसरीकडे नातेसंबंधांमुळेच ६० टक्के महिला तणावाखाली असल्याचे एका आॅनलाइन सर्वेक्षणातून समोर आले आहे.

६० टक्के महिलांना नात्यातूनच होतो त्रास
मुंबई : गतिमान झालेल्या जीवनाबरोबर पाश्चात्त्य संस्कृतीच्या मूल्यांचा परिणामही समाजावर होत आहे़ पण दुसरीकडे नातेसंबंधांमुळेच ६० टक्के महिला तणावाखाली असल्याचे एका आॅनलाइन सर्वेक्षणातून समोर आले आहे.
मानसिक आधार देणारे नातेसंबंधच सध्या महिलांचे मानसिक संतुलन बिघडवत आहेत. पण हा विषय घरगुती असल्यामुळे याची बाहेर कुठेच चर्चा केली जात नाही. ताण वाढला तरीही कोणत्याही मानसोपचारतज्ज्ञाकडे जाऊन सल्ला घेण्यासाठी या महिला धजावत नसल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले. २० ते २५ टक्के जण हे जीवनात आलेल्या साचलेपणामुळे तणावाखाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चाकोरीबद्ध झालेले आयुष्य अनेकांच्या तणावाचे कारण आहे, तर अनेकांना आयुष्यात पुढे काय करायचे, हेच स्पष्ट नसते. आयुष्यात नक्की काय हवे आहे याची स्पष्टता नसल्याने अनेक जण तणावाखाली असतात. अनेकांना समस्या असतात, पण त्याचे उत्तर शोधण्यासाठी ते मानसोपचारतज्ज्ञांचा आधार घ्यायला घाबरतात. मानसोपचारतज्ज्ञांकडे गेल्यास लोक काय म्हटतील, असेही त्यांना वाटते. म्हणूनच अनेक जण उपचार घेण्याचे टाळतात, असे समोर आले आहे. त्यामुळे आॅनलाइन समुपदेशन करण्यासाठी बंगलोरमध्ये ‘हेल्थ इमाइंड’ची सुरुवात करण्यात आली.
या साइटवर दरमहा सुमारे १ हजार २०० जण भेट देतात. येथील मानसोपचारतज्ज्ञांशी चर्चा करून सल्ला घेतात. यातूनच किती जण तणावाखाली असूनही समोर यायला घाबरत असल्याचे स्पष्ट झाले. नवरा-बायको, भाऊ-बहीण, सासू-सून यांच्या नातेसंबंधांत असलेल्या तणावाचा त्रास अनेकांना होत आहेत. पण घरगुती गोष्टी बोलायच्या कोणाशी, हा त्यांना प्रश्न असतो. यांच्यासाठी समुपदेशनाची गरज असते, पण अनेक जण पुढे येत नाहीत, असे सहव्यस्थापक डॉ. सुनीता महेश्वरी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मानसोपचारतज्ज्ञांकडे गेल्यास लोक काय म्हटतील, असेही त्यांना वाटते. म्हणूनच अनेक जण उपचार घेण्याचे टाळतात, असे यातून समोर आले आहे.