Join us

मालाडमध्ये ६० पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद, पक्षीप्रेमी अभ्यासकांचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 05:13 IST

मालाड पूर्वेकडील वनविभागाच्या हद्दीमध्ये वड, पिंपळ, पेरू, फणस, आंबा, काजू, इलायती चिंच आणि आवळा इत्यादी फळझाडे आणि फुलझाडांची लावगड करण्यात आली आहे.

मुंबई : मालाड पूर्वेकडील वनविभागाच्या हद्दीमध्ये वड, पिंपळ, पेरू, फणस, आंबा, काजू, इलायती चिंच आणि आवळा इत्यादी फळझाडे आणि फुलझाडांची लावगड करण्यात आली आहे. त्यामुळे येथे ६० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद पक्षीप्रेमी अभ्यासकांनी केली आहे. येथे स्थलांतरीत पक्षीही मोठ्या प्रमाणात दिसून येतात.स्वर्गीय नर्तक, तांबट, हळद्या, साळुंखी, बुलबुल, कोकिळा, कोतवाल, चिमणी, सुर्यपक्षी, शिंपी, खंड्या, पोपट, घुबड, भारद्वाज, दयाळ, नाचण, कोळीखाऊ, पाणकोंबडी इत्यादी पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. येथे विविध प्रकारच्या फुलझाडांची लागवड करण्यात आली असून असंख्य प्रकारची रंगीबेरंगी फुलपाखरे ही मोठ्या संख्येने दिसून येतात. कीटकांच्याही संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिसरात धामण, नाग यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांचाही वावर आहे.स्वर्गीय नर्तक पक्ष्यांची आढळली घरटीवन्यजीव अभ्यासक प्रवीण दौंड या संदर्भात म्हणाले की, मालाड येथील वनविभागाच्या परिसरात विविध फळझाडे, फुलझाडांची लागवड करण्यात आली असून तिथे पक्ष्यांना पोषक वातावरण मिळते. त्यामुळे दिवसेंदिवस विविध प्रजातींचे पक्षी या परिसरात पाहायला मिळतात. स्वर्गीय नर्तक हा पक्षी साधारण फेब्रुवारी महिन्यात येतो. हा पक्षी दोन-तीन महिने राहून पुन्हा निघून जातो. मालाडमध्ये स्वर्गीय नर्तक पक्ष्यांची घरटेही आढळून आली आहेत. अनेक स्थलांतरित पक्षी ही या ठिकाणी येते आहेत.

टॅग्स :पक्षी अभयारण्यमुंबई