Join us  

मृत भावाच्या नावावर मुंबई महापालिकेत ६ वर्षे नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 6:37 AM

मृत्यू झालेल्या भावाच्या नावाचा आणि बनावट कागदपत्रांचा वापर करीत, एकाने मुंबई महापालिकेत सहा वर्षे सुरक्षारक्षक म्हणून नोकरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

ठळक मुद्देगुन्हा दाखल, पोलिसांकड़ून तपास सुरू

मनीषा म्हात्रेमुंबई : ११ वर्षांपूर्वीच मृत्यू झालेल्या भावाच्या नावाचा आणि बनावट कागदपत्रांचा वापर करीत, एकाने मुंबई महापालिकेत सहा वर्षे सुरक्षारक्षक म्हणून नोकरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुलडाणा पोलीस या इसमाला एका प्रकरणात ताब्यात घेण्यासाठी मुंबईत धडकल्यानंतर ही बाब उघड झाली आणि महापालिका प्रशासनालाही धक्का बसला. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी गुन्हा नोंदवीत अधिक तपास सुरू केला आहे.

महापालिकेच्या परिमंडळ २ मधील घाटकोपरच्या  पाणीपुरवठा व मल निस्सारण विभागात कार्यरत असलेले उपप्रमुख सुरक्षा अधिकारी संजय कृष्णा आर्दाळकर (५४) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१३ मध्ये सुरक्षारक्षकांच्या रिक्त पदावर भरती करण्यात आली होती. 

या भरतीत दिनेश प्रल्हाद पेरे याचीही निवड होत ३० जुलै २०१४ रोजी त्याची नियुक्ती करण्यात आली होती.  सद्यस्थितीत पेरे हा भांडुप संकुल येथील वाद्यवृंद विभाग येथे सुरक्षारक्षक पदावर कार्यरत आहे. गेल्या वर्षी १९ डिसेंबरला बुलडाणा ग्रामीण पोलिसांचे पथक हुंड्यासंबंधित दाखल गुन्ह्यात पेरे याला हजर राहण्याबाबत समज देऊन गेले. त्यानंतर  कुठलीही माहिती न देता पेरे गायब झाला. पालिका प्रशासनाने बुलडाणा पोलिसांकडे चौकशी करताच, तो दिनेश नसून मंगेश हरिभाऊ पेरे असल्याचे समजले. दिनेश याचा २००९ मध्येच मृत्यू झाला असून, त्याच्या कागदपत्रांवर मंगेश पेरे याने नोकरी मिळविल्याचे स्पष्ट झाले. यासंबंधित कागदपत्रेही पालिकेने मिळविली. बनावट कागदपत्रे सादर करून नोकरी मिळविल्याप्रकरणी पालिकेने पोलिसात धाव घेत तक्रार दिली आहे. तपास सुरू याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय भिसे यांनी सांगितले. 

निवड अधिकाऱ्यांचीही होणार चौकशीमंगेश पेरेची भरती कशी झाली? त्याने स्वतःचे बनावट ओळखपत्र कुणाकडून व कसे तयार करून घेतले, यामागे आणखी कुणाचा हात आहे का, याबाबत अधिक तपास सुरू आहे. यात निवड प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार असल्याचे समजते आहे. तसेच बुलडाणा पोलिसांकड़ूनही पेरेसंबंधित माहिती मागविण्यात येत आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकानोकरीमुंबईपोलिस