बोरीवली दरोडाप्रकरणी ६ अटकेत

By Admin | Updated: May 27, 2014 05:33 IST2014-05-27T05:33:48+5:302014-05-27T05:33:48+5:30

बोरीवलीत दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा घालून तब्बल साडेसहा कोटींचे हिरे, हिरेजडीत दागिन्यांसह पसार झालेल्या सहा जणांच्या टोळीला एसीपी प्रफुल्ल भोसले यांच्या पथकाने गजाआड केले

6 held in Borivli Draft | बोरीवली दरोडाप्रकरणी ६ अटकेत

बोरीवली दरोडाप्रकरणी ६ अटकेत

मुंबई : बोरीवलीत दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा घालून तब्बल साडेसहा कोटींचे हिरे, हिरेजडीत दागिन्यांसह पसार झालेल्या सहा जणांच्या टोळीला गुन्हे शाखेचे एसीपी प्रफुल्ल भोसले यांच्या पथकाने मुंबई, यूपीतून गजाआड केले. अटक आरोपींकडून सुमारे ५ कोटींचे हिरे या पथकाने हस्तगत केले आहेत. प्राथमिक तपासातून उदयभान जमीनदार ठाकूर ऊर्फ डॉक्टर हा या सशस्त्र दरोड्याचा मास्टरमार्इंड होता, असे पुढे आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने उदयभानची वहिनी सावित्री ठाकूर (२३), पुतण्या ओमप्रकाश अवधेष सिंग ऊर्फ ननकऊ (३८), बिपीन सिंग (२३), धीरज ईश्वर बहादूर सिंग (२८) आणि जुना साथीदार राजेश विजय सरोज (४०) यांनाही या गुन्ह्यात अटक केली आहे. न्यायालयाने या सर्वांना ५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत धाडले आहे. जेके लॉजिस्टीक ही कंपनी हिरे किंवा अन्य मौल्यवान वस्तूंची सुरक्षितपणे ने-आण करण्याचे काम करते. ९ मे रोजी सुरतहून साडेसहा कोटींच्या हिर्‍यांचे पार्सल मुंबईत आणून ते दुसर्‍या दिवशी विमानाने परदेशात धाडण्याची जबाबदारी या कंपनीवर होती. ठरल्याप्रमाणे कंपनीने एस आर सिक्युरीटीजकडे हे काम सोपविले. हिरे रेल्वेने बोरीवली स्थानकात आले. जेके कंपनीने ते वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालयात आणण्यासाठी सिक्युरीटी व्हॅन जोडून दिली होती. एस आर कंपनीचे सुपरवायझर रमेशकुमार गुप्ता आणि त्यांचे अन्य सहकारी सिक्युरीटी व्हॅनमध्ये बसले. या व्हॅनचा चालक होता उदयभान. व्हॅन नॅशनल पार्कसमोरील पश्चिम द्रुतगती मार्गावर आली तेव्हा उदयभानने टायर पंक्चर झाल्याची शंका व्यक्त करून ती रस्त्याकडेला घेतली. तो खाली उतरला आणि अवघ्या काही सेकंदांतच चार सशस्त्र तरुणांनी व्हॅन कब्जात घेतली. व्हॅनमधील स्ट्राँगरूममध्ये हिरे घेऊन बसलेल्या गुप्ता आणि त्यांच्या सहकार्‍यांना बेदम मारहाण करून उदयभानने ही व्हॅन विरार, वजे्रश्वरी रोडवर थांबवली. हिरे हिसकावून उदयभान आणि त्याचे साथीदार मागून आलेल्या टवेरा गाडीत बसून पसार झाले. दरम्यान, उदयभानची ओळख एसीपी प्रफुल्ल भोसले यांच्या पथकाने प्रथम पटवली. दहिसर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक मिलिंद खेतले आणि त्यांच्या पथकाने संयुक्त तपासात भाग घेतला. ही पथके गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्टÑात तळ ठोकून होती. तीन ते चार दिवसांपूर्वी यापैकी तीन आरोपींना पकडले. त्यानंतर उर्वरित तीन आरोपींना गजाआड करण्यात आले. चौकशीत दरोड्यानंतर लगेचच हिर्‍यांची वाटणी झाली. उदयभान हा प्रमुख आरोपी असल्याची माहिती देताना सहआयुक्त सदानंद दाते यांनी तपास पथकाचे कौतुक केले. एकूण २६१ हिरे चोरी झाले होते त्यापैकी ८० टक्के हिरे हस्तगत करण्यात एसीपी भोसले यांच्या पथकाला यश आल्याचे त्यांनी सांगितले. यातील प्रत्येक हिरा हा सुमारे २ लाख रुपये किमतीचा होता. या गुन्ह्यात जितेंद्र नावाच्या साथीदारासह काही आरोपींचा शोध सुरू असल्याचे समजते. (प्रतिनिधी)

Web Title: 6 held in Borivli Draft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.