Join us  

निवडणुकीपूर्वी मुंबई पूरमुक्त करण्यासाठी होणार ५८ कामे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 2:43 AM

पावसाळ्यात पाणी भरणाऱ्या ५८ ठिकाणी वर्षभरात कामे केली जाणार आहेत. ही कामे तातडीने सुरू करण्याचे कार्यादेश देण्याची परवानगी स्थायी समितीच्या बैठकीत नुकतीच देण्यात आली. यासाठी तब्बल १९० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबापुरी होऊन नागरिकांची गैरसोय होत असते. पुढच्या वर्षी निवडणुकीचा बार उडण्यापूर्वी मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महापालिकेची धावपळ सुरू आहे. यासाठी पावसाळ्यात पाणी भरणाऱ्या ५८ ठिकाणी वर्षभरात कामे केली जाणार आहेत. ही कामे तातडीने सुरू करण्याचे कार्यादेश देण्याची परवानगी स्थायी समितीच्या बैठकीत नुकतीच देण्यात आली. यासाठी तब्बल १९० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे, त्यांची क्षमता, सध्याची पंपिंग क्षमता व पाणलोट क्षेत्र, पर्जन्यवृष्टीचा अहवाल, भरती-ओहोटी इत्यादी मुद्द्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास पर्जन्य जलवाहिन्या खात्याद्वारे करण्यात आला. त्यानुसार आवश्यक उपाययोजना अंमलात आणण्यासाठी लवकरच ही कामे पालिका करणार आहे. यापैकी बहुतांश कामे येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. अशी आहेत कामे माटुंगा गांधी मार्केट या ठिकाणी ९०० मिलिमीटर व्यासाची अतिरिक्त पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. पाण्याचा उपसा जलद होण्यासाठी सात पंप बसविण्यात येणार असून, सहा पंप भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत.सांताक्रुज (पश्चिम) परिसरातील जे. के. मेहता मार्गालगत  असणाऱ्या ६०० मिलिमीटर व्यासाच्या पर्जन्य जलवाहिनीची क्षमता १२०० मिलिमीटर व्यास इतकी करण्यात येणार आहे. यामुळे रेल्वे स्टेशनलगतच्या परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने होईल.अंधेरी (पूर्व) परिसरात असणाऱ्या कोंडीविटे नाल्याचे आर.सी.सी. रुंदीकरण करण्यात येणार आहे, तर सहार रोडनजीक असणाऱ्या चार मीटर नाल्याचे रुंदीकरण सहा मीटरपर्यंत करण्यात येणार आहे.चेंबूर (पश्चिम) पी. एल. लोखंडे मार्गानजीक असलेल्या पर्जन्य जलवाहिनीचा आकार १.५ x १.२ मीटर इतका वाढविण्यात येणार आहे. बोरीवली (पश्चिम) चंदावरकर मार्गानजीक असणाऱ्या नाल्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. गोरेगाव (पश्चिम) महेश नगर व एम.टी.एन.एल. जंक्शननजीक असणाऱ्या पिरामल नाल्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबईत पावसाचा हाहाकार