राज्यात दिवसभरात ५७ टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:09 IST2021-02-06T04:09:15+5:302021-02-06T04:09:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात गुरुवारी ५९३ लसीकरण सत्र पार पडले. यात दिवसभरात ३४ हजार ९०७ लाभार्थ्यांना लसीकरण ...

राज्यात दिवसभरात ५७ टक्के लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात गुरुवारी ५९३ लसीकरण सत्र पार पडले. यात दिवसभरात ३४ हजार ९०७ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी ३४ हजार ३८६ लाभार्थ्यांना कोविशिल्ड या लसीने तर ५२१ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीने लसीकरण करण्यात आले. दिवसभरात ५७ टक्के लसीकरण झाले. राज्यात आतापर्यंत ३ लाख ८९ हजार ५४० लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण कऱण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
राज्यात दिवसभरात दोन जिल्ह्यांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक लसीकऱण करण्यात आले. यात अकोल्यात ११६ टक्के लसीकरण, तर पालघरमध्ये १०९ टक्के लसीकरणाची नोंद झाली. यात अकोल्याचे दिवसाचे ३०० लक्ष्य होते, दिवसभरात लसीकरणाला अधिक प्रतिसाद मिळून ३४८ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. तर त्याखालोखाल पालघरमध्ये १२०० चे उद्दिष्ट होते, त्यात १३०९ लाभार्थ्यांनी लस घेतली.
राज्यात दिवसभरात सर्वांत कमी लसीकरणाची नोंद बीड येथे झाली, या ठिकाणी ३० टक्के लसीकरण झाले असून ६०० पैकी १७७ लाभार्थ्यांनी लस घेतली आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यात ६२१ लाभार्थ्यांपैकी केवळ २२९ कर्मचाऱ्यांनी लस घेतली, या ठिकाणी ३७ टक्के लसीकरणाची नोंद झाली.