रायगड जिल्ह्यात ५६५ शाळाबाह्य मुले

By Admin | Updated: July 4, 2015 23:45 IST2015-07-04T23:45:52+5:302015-07-04T23:45:52+5:30

रायगड जिल्ह्यामध्ये शाळाबाह्य असलेल्या मुलांसाठी शनिवारी राबविण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात सुमारे ५६५ मुले आढळून आली. सकाळी सात वाजल्यापासून एकाच

565 out of school children in Raigad district | रायगड जिल्ह्यात ५६५ शाळाबाह्य मुले

रायगड जिल्ह्यात ५६५ शाळाबाह्य मुले

अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये शाळाबाह्य असलेल्या मुलांसाठी शनिवारी राबविण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात सुमारे ५६५ मुले आढळून आली. सकाळी सात वाजल्यापासून एकाच वेळी १५ तालुक्यांत सात हजार ८८७ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबविली. शाळेत न जाणाऱ्या मुलांना आता तत्काळ त्या त्या ठिकाणच्या शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. ही आकडेवारी दुपारी चार वाजेपर्यंतची असून त्यामध्ये आणखी वाढ होणार असल्याचे रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने लोकमतशी बोलताना सांगितले.
समाजातील तळागाळातील प्रत्येक मुलाने शाळेत जावे, शिकावे आणि मुख्य प्रवाहात यावे हा या मोहिमेमागचा प्रमुख उद्देश आहे. सकाळी सात वाजता या मोहिमेला सुरुवात झाली.
घरोघरी, बस स्थानक, रेल्वे स्थानक, सार्वजनिक ठिकाणे, आदिवासीवाड्या-पाडे, झोपडपट्टी, अशा सर्व ठिकाणी शाळाबाह्य मुलांचा शोध सायंकाळी सात वाजेपर्यंत घेण्यात येत होता. जी मुले शाळेत जात नसेल त्यांची नोंद घेऊन त्याच्या बोटावर शाईने खूण करण्यात येत होती. जेणेकरून त्यांची पुन्हा गणना होऊ नये.
रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी त्यांच्या पथकासह पनवेल तालुक्यातील झोपडपट्टीपासून मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. चार वाजेपर्यंत एकट्या पनवेल तालुक्यातील सुमारे २९२ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळले.
जिल्ह्यामध्ये सात हजार ४२५ सर्व्हेक्षण अधिकारी, ३८७ विभागीय अधिकारी, ४५ नियंत्रण अधिकारी, ३० नियंत्रण समन्वयक असे एकूण सात ८८७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला. शाळाबाहय मुलांच्या शिक्षणासाठी आता सरकार नवे उपक्रम राबविणार आहे. (वार्ताहर)

शिक्षणास वंचित मुले
अलिबाग- ५२, सुधागड-३८, मुरुड - २५, महाड- ११, पनवेल-२९२, रोहे- १५, उरण-५९, पोलादपूर-४, पेण- १०, म्हसळा-७, कर्जत-२, खालापूर-१९, माणगाव-४, श्रीवर्धन-८ आणि तळा तालुक्यात एकही शाळाबाह्य मुले आढळली नाहीत. या आकडेवारीमध्ये वाढ होणार आहे.

Web Title: 565 out of school children in Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.