Join us  

खासगी रुग्णालयांतील ५,६४४ खाटा पालिकेच्या ताब्यात; १५ जूनपर्यंत संख्या लाखावर नेण्याचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 3:51 AM

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ३१ मेपर्यंत मुंबईत ४५ हजार रुग्ण असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मुंबई : मुंबईतील ३३ खासगी रुग्णालयांतील ८० टक्के नियमित खाटा आणि अतिदक्षता विभागातील १०० टक्के खाटा मुंबई महालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे पालिकेकडे ५,६४४ अतिरिक्त खाटा आता उपलब्ध झाल्या आहेत. राखीव खाटांवर शासकीय दरात उपचार केले जाणार आहेत. तर उर्वरित २० टक्के खाटांचा वापर व्यावसायिक दराने करण्याची रुग्णालयांना मुभा आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ३१ मेपर्यंत मुंबईत ४५ हजार रुग्ण असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच रुग्णांना तत्काळ उपचार मिळण्यासाठी खाटांची क्षमता वाढविण्यात येत आहे.

३,०२० बेड इतर आजारांसाठी

खासगी रुग्णालयांमध्ये २,६२४ खाटा कोरोनाबाधितांसाठी व ३,०२० खाटा इतर आजारांवर उपचारासाठी वापरल्या जातील. खासगी रुग्णालयांत सर्वसामान्य रुग्णांसाठी शासकीय दरात ४१७ कोरोना अतिदक्षता विभाग उपलब्ध असतील. तर, ५३८ इतर अतिदक्षता विभागही असतील.

महालक्ष्मी रेसकोर्स, गोरेगाव, दहिसर, मुलुंड येथे सात हजारांपेक्षा जास्त खाटा उपलब्ध होत आहेत. ही कोविड हेल्थ सेंटर पूर्ण क्षमतेने पुढील दोन आठवड्यांत सुरू होतील. तर ३१ मेपर्यंत एनएससीआय, वरळीत ६४० खाटा, महालक्ष्मी येथे ३०० खाटा, बीकेसी वांद्रे येथे एक हजार खाटा आणि नेस्को गोरेगाव येथे ५३५ अशा एकूण २,४७५ खाटा कोविडबाधितांसाठी उपलब्ध होतील.

कोरोना लक्षणे असलेल्यांसाठी ३१ मेपर्यंत १४ हजार खाटा उपलब्ध होतील. सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी ३० हजार खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

१५ जूनपर्यंत मुंबईत एक लाख खाटा तयार ठेवण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे. याबाबत उपाययोजनांची माहिती मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली. मुंबईतील मोठ्या मैदानांवर, सभागृहांत विलगीकरण कक्षही पालिकेने सुरू केले आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई