जिल्ह्यात ५६ संवेदनशील मतदान केंद्रे
By Admin | Updated: October 9, 2014 22:54 IST2014-10-09T22:54:47+5:302014-10-09T22:54:47+5:30
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील ५६ संवेदशील मतदान केंद्रांवर ७६ सूक्ष्म निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत

जिल्ह्यात ५६ संवेदनशील मतदान केंद्रे
अलिबाग : जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील ५६ संवेदशील मतदान केंद्रांवर ७६ सूक्ष्म निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रियेतील सूक्ष्म निरीक्षकांनी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अतिशय काळजीपूर्वक आणि परस्पर समन्वयांद्वारे मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी, असे मार्गदर्शन कायदा व सुव्यवस्था समिती व सुरक्षा आराखडा समिती प्रमुख तथा रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी केले आहे.
जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड या सात विधानसभा मतदार संघात येत्या १५ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या विधानसभा मतदार संघासाठी मतदान केंद्रावर नेमण्यात आलेल्या सूक्ष्म निरीक्षकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात प्रशिक्षण सत्र घेण्यात आले. त्यात या ७६ सूक्ष्म निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या, त्यावेळी बागल बोलत होते. थेट केंद्रीय निवडणूक निरीक्षकांच्या नियंत्रणाखाली नियुक्त केलेल्या सूक्ष्म निरीक्षकांनी थेट केंद्रीय निवडणूक निरीक्षकांच्या नियंत्रणाखाली काम करावयाचे आहे. सूक्ष्म निरीक्षक हे फक्त निरीक्षक असून ते कोणत्याही मतदान केंद्र पथकाचे सदस्य नसतील. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत सूक्ष्म निरीक्षकांना फोटो पास व ओळखपत्र देण्यात येतील.
त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मतदारसंघातील नियोजनाबाबत माहिती घ्यावयाची आहे. मतदानाच्या दिवशी सूक्ष्म निरीक्षकांना मतदान केंद्रावर जाण्या-येण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात येईल त्यामुळे त्यांनी निवडणुकीसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यासमवेत प्रवास करु नये. मतदानाच्या दिवशी संबंधित सूक्ष्म निरीक्षकांनी मतदान केंद्रावर एक तास अगोदर किंवा मतदानाच्या एक दिवस आधी संध्याकाळी पोहचणे आवश्यक आहे.
मतदानाच्या सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्याबाबतही आयोगाकडील मार्गदर्शक तत्त्वांची माहितीही यावेळी निवासी उपजिल्हाधिकरी सतीश बागल यांनी सविस्तरपणे दिली व सूक्ष्म निरीक्षकांच्या अडीअडचणी यावेळी समजावून घेवून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)