Join us

५५ वर्षीय महिलेची पित्ताशयाच्या त्रासातून सुटका, शस्त्रक्रियेद्वारे खडे काढण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 14:19 IST

अशा स्थितीत गुंतागुंत वाढल्याने शस्त्रक्रिया करणं अवघड होतं. मात्र, डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारून महिलेच्या पित्ताशयातून हे खडे बाहेर काढले आहेत.

मुंबईतील एका ५५ वर्षीय महिलेवर जटील शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कांदिवली येथील नामहा रुग्णालयात या महिलेवर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून पित्ताशयातील खडे काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या महिलेच्या पित्ताशयात फक्त ५ ते ६ खडे होते. परंतु उपचारासाठी उशिरा आल्याने पित्ताचे खडे फुटून पोटात संसर्ग पसरला होता. अशा स्थितीत गुंतागुंत वाढल्याने शस्त्रक्रिया करणं अवघड होतं. मात्र, डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारून महिलेच्या पित्ताशयातून हे खडे बाहेर काढले आहेत.लॅप्रोस्कोपिक आणि बॅरिएट्रिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांच्या नेतृत्वाखाली अन्य डॉक्टरांच्या टीमनं ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. मुंबईत राहणाऱ्या रेखा सिंह (नाव बदललेलं) यांना मागील अनेक आठवड्यांपासून पोटदुखीचा त्रास जाणवत होता. खाल्ल्यानंतर अपचन (ऍसिडिटी) होत असल्याने त्यांना अस्वस्थपणा वाटत होता. मात्र, कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असल्याने रुग्णालयात न जाता त्यांनी घरगुती उपचार करणं पसंत केलं. पोटात वेदना जाणवत असल्याने वेदनाशामक औषधही त्या घेत होत्या. परंतु वेदना असह्य होऊ लागल्याने त्यांनी स्थानिक डॉक्टरांना दाखवलं. रुग्णांची स्थिती पाहून डॉक्टरांनी त्यांना पोटाची सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. या सोनोग्राफी अहवालात त्यांच्या पित्ताशयात खडे असल्याचं निदान झालं.साधारणतः आठवडाभर या महिलेवर घरीच औषधोपचार सुरू होते. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेरीस ओटीपोटात तीव्र वेदना, ताप, उलट्या होणं आणि रक्तदाब कमी झाल्यानं त्यांना तातडीने कांदिवली येथील नामहा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयात सिटीस्कॅन चाचणी केली असता असे दिसून आले की, पित्त मूत्राशय या महिलेच्या पोटात फुटला होता. ज्यामुळे तिच्या पोटाच्या उजव्या बाजूला संसर्ग झाला होता. याशिवाय या महिलेच्या रक्तात (सेप्टिसीमिया) देखील हा संसर्ग पसरला होता. कांदिवली येथील नामहा हॉस्पिटलमधील लॅपरोस्कोपिक आणि बॅरिएट्रिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर म्हणाल्या की, “शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि अवघड होती. परंतु, डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारून ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. शस्त्रक्रियेनंतर या महिलेला एका आठवड्यानंतर घरी सोडण्यात आले. आता या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांच्या या असहय वेदनेतून सुटका झाली आहे.’’रुग्ण रेखा सिंह म्हणाल्या की, “कोरोना या आजाराचा संसर्ग होण्याच्या भीतीमुळे आम्ही रुग्णालयात जाणे टाळत होतो आणि घरगुती उपचार करत होतो. वेळीच निदान न झाल्यास अशा प्रकारची गुंतागुंत निर्माण होऊन संसर्ग होऊ शकेल. आम्हाला वेळेवर उपचार दिल्याबद्दल आम्ही डॉ. अपर्णा भास्कर यांचे आभारी आहोत.”