संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला

By सचिन लुंगसे | Updated: May 4, 2025 11:07 IST2025-05-04T11:07:00+5:302025-05-04T11:07:48+5:30

या अभ्यासात संशोधनाबरोबरच क्षमता बांधणीवर सुद्धा भर देण्यात आला व ५० हून अधिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष फिल्डवर तंत्रज्ञान वापराचे प्रशिक्षण देण्यात आले

54 leopards found in Sanjay Gandhi National Park in Mumbai; One leopard reached Vasai after covering a distance of 9 km | संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला

मुंबई - महाराष्ट्र वन विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या व्यापक कॅमेरा ट्रॅप सर्वेक्षणात मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि लगतच्या परिसरात ५४ बिबट्यांची नोंद करण्यात आली आहे. यातूनच या शहरातील माणसे आणि बिबट्यांच्या अनोख्या सहजीवनाची कहाणी देखील अधोरेखित झाली आहे. 

उद्यान, आरे मिल्क कॉलोनी परिसर आणि तुंगारेश्वर अभयारण्यामध्ये करण्यात आलेले हे सर्वेक्षण फेब्रुवारी ते जून २०२४ दरम्यान पार पडले.  संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात ५७ ठिकाणी आणि तुंगारेश्वर परिसरात ३३ ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. या संपूर्ण अभ्यासात वन विभागाचे कर्मचारी सक्रियपणे सहभागी झाले आणि त्यांच्या क्षमता बांधणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्रेही आयोजित करण्यात आली.

अभ्यासादरम्यान एक विशेष घटना नोंदवली गेली ज्यातून मुंबईकर बिबट्यांना तोंड द्यावे लागत असलेल्या आव्हानांची सुद्धा कल्पना येऊ शकते. प्रथम तुंगारेश्वर अभयारण्य परिसरात आढळलेला एक नर बिबट्या सुमारे ९ किलोमीटर अंतर पार करून, घनदाट मानवी वस्त्या, महामार्ग व रेल्वे मार्ग ओलांडून वसई किल्ल्यापर्यंत पोहोचला. या घटनेतून या बिबट्यांची परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमता दिसून येते.  या अभ्यासात संशोधनाबरोबरच क्षमता बांधणीवर सुद्धा भर देण्यात आला व ५० हून अधिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष फिल्डवर तंत्रज्ञान वापराचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे भविष्यातील अभ्यास स्थानिक पातळीवर देखील होऊ शकेल.

इतक्या दाट लोकवस्तीच्या या शहरात या देखण्या बिबट्यांचं सातत्यपूर्ण अस्तित्व म्हणजे निसर्गाच्या अप्रतिम लवचिकतेचं अतुलनीय उदाहरण आहे. या प्राण्यांचा अधिवास असलेली अशी मरूद्यानं जपणं किती महत्त्वाचं आहे हेच या अभ्यासातून अधोरेखित होतं. अशा शास्त्रीय पाहण्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे कारण यातून वन्यजीवांच्या अस्तित्वाची अचूक माहिती तर मिळतेच परंतु त्याचबरोबरच त्यांच्या संवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यासही मोठी मदत होते. - अनिता पाटील (वन संरक्षक व संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान)

Web Title: 54 leopards found in Sanjay Gandhi National Park in Mumbai; One leopard reached Vasai after covering a distance of 9 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.