मुंबई - सिंगापूर, हाँगकाँगसह इतर देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या १० आठवड्यात याठिकाणी ३० पटीने रुग्ण वाढलेत. त्यातच भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाचे ५३ रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता मुंबई महापालिकेने गाईडलाईन्स जारी केली आहे.
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोविड १९ रुग्णांसाठी उपचार आणि मार्गदर्शन सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी विशेष खाट आणि खोलीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. बीएमसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, काही दिवसांपासून सिंगापूर, हाँगकाँगसह पूर्व आशियात आणि अन्य देशांत कोविड प्रकरणांमध्ये वाढीचे संकेत मिळत आहेत. मुंबई महापालिकेचे आरोग्य विभाग कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक पाऊले उचलत असून रुग्णवाढीवर नजर ठेवून आहोत.
जानेवारी २०२५ ते एप्रिल २०२५ या काळात कोविड रुग्णांची संख्या कमी होती. परंतु मे महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. परंतु मुंबई महापालिकेने नागरिकांना घाबरण्याचं कारण नाही तर सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबई महापालिकेने कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये २० बेड (MICU), बालरोग आणि गर्भवती महिलांसाठी २० बेड आणि ६० सामान्य बेड तर कस्तुरबा रुग्णालयात २ अतिदक्षता खाटा आणि १० अन्य खाटांचा वार्ड उपलब्ध केला आहे.
कोविड १९ ची लक्षणे काय?
कोविड १९ मध्ये सामान्यत: ताप, खोकला, घसा खवखवणे, थकवा येणे, शरीरात वेदना, डोकेदुखी यांचा समावेश आहे. त्याशिवाय कधी कधी सर्दी, नाक वाहणे, चव न येणे यासारख्या लक्षणांचा समावेश आहे. ही लक्षणे सामान्य रुग्णांत समान असू शकतात परंतु प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळा आजार असू शकतो. गंभीर प्रकरणी श्वास घेण्यास अडचण येते. जर तुम्हाला कुठलीही लक्षणे दिसत असतील तर तात्काळ महानगरपालिकेच्या रुग्णालयात अथवा कौटुंबिक डॉक्टरकडे जाऊन सल्ला घ्यावा.