ऐरोलीत मतदारसंघात ५२ टक्के मतदान
By Admin | Updated: October 16, 2014 00:57 IST2014-10-16T00:57:48+5:302014-10-16T00:57:48+5:30
विधानसभेच्या ऐरोली मतदार संघातून एकूण ५१.८२ टक्के मतदान झाले. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत साधारण ८ टक्के मतदानाची नोंद झाली.

ऐरोलीत मतदारसंघात ५२ टक्के मतदान
नवी मुंबई : विधानसभेच्या ऐरोली मतदार संघातून एकूण ५१.८२ टक्के मतदान झाले. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत साधारण ८ टक्के मतदानाची नोंद झाली. दुपारनंतर मात्र मतदार मोठ्याप्रमाणात बाहेर पडले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल ५१.८२ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
ऐरोली मतदार संघात ४ लाख ८ हजार ४३ मतदार आहेत. एकूण ३७९ मतदान केंद्रांवर आज मतदान झाले. या मतदार संघात ६९ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली होती. असे असले तरी कोणताही अनुचित प्रकार न घडता अगदी शांततेत मतदान झाले. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या सत्रात मतदारांचा काहीसा धीमा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर विरळ गर्दी दिसून आली. दुपारी बारा वाजल्यानंतर कोपरखैरणे, घणसोली, रबाळे आणि ऐरोलीतील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.
मात्र दिघा परिसरातील ईश्वरनगर, गणपतीपाडा, ऐरोली गाव आदी भागात मतदारांची गर्दी कमी होती. त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत संपूर्ण मतदार संघात साधारण २८ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतर मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले. त्यामुळे मतदार संघातील बहुतांशी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. मतदानाची वेळ संपल्यानंतरही अनेक केंद्रासमोर रांगा लागल्या होत्या. शेवटच्या एका तासात मोठ्याप्रमाणात मतदान झाल्याने सांयकाळी सहा वाजेपर्यंत एकूण ५१.८२ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक अधिकारी जगन्नाथ वीरकर यांनी सांगितले.