Join us  

एमएमआरडीएकडून शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 4:16 AM

आरे कॉलनीमध्ये मेट्रो-३ मार्गिकेच्या कारशेडसाठी झालेल्या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणवाद्यांनी आंदोलन केले.

मुंबई : आरे कॉलनीमध्ये मेट्रो-३ मार्गिकेच्या कारशेडसाठी झालेल्या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणवाद्यांनी आंदोलन केले. हा विरोध पाहता मुंबई महानगर क्षेत्रात जंगल उभारण्याचा निर्धार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केला आहे. याचाच एक भाग म्हणून एमएमआरडीएने मुंबईजवळील शिळफाटा येथे वन खात्याच्या मालकीच्या ४६ हेक्टर जमिनीवर सुमारे ५१ हजार १०६ वृक्षांची लागवड केली आहे. यासाठी सुमारे पाच कोटी खर्च करण्यात आला आहे.

एमएमआरडीएतर्फे मुंबई आणि मुंबईनजीकच्या विभागात भविष्यात मेट्रोसह अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांमध्ये काही वृक्ष बाधित होतील, याचा विचार करून एमएमआरडीएने बाधित वृक्षांच्या पाचपट वृक्षांची लागवड केली आहे. ही लागवड एमएमआर क्षेत्रामध्ये शिळ-गोठेघर भागात ४६ हेक्टर जमिनीवर केली. अर्जुन, कडुनिंब, जांभूळ, बेहडा, कांचन, वड, पिंपळ, कदंब, वावळा आदी १७ प्रकारच्या रोपांसह काही औषधी रोपांची लागवडही येथे करण्यात आली आहे.

पर्यावरणीय संतुलन राखण्याच्या दृष्टीने मुंबईपासून दूर शिळ येथील जंगलामध्ये आॅगस्ट महिन्यात वृक्षलागवडीला सुरुवात केली. भविष्यातही अधिकाधिक वृक्षलागवड आणि त्यांचे संवर्धन यावर विशेष भर देण्याचा एमएमआरडीएचा मानस असल्याचे प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी स्पष्ट केले.

प्राधिकरणाच्या विविध विकासकामांमध्ये बाधित होणाऱ्या वृक्षांच्या पुनर्रोपणासाठी शिळफाटा, ठाणे येथील दहा हेक्टर क्षेत्र राखीव ठेवण्यात आले आहे. यासह लागवड केलेल्या वृक्षांची देखभाल करण्यासाठी तीन वर्षांसाठी प्रत्येक वृक्षामागे १२२ ८ रुपये खर्च करण्यात येतील. देखभाल करण्याची जबाबदारी वन विभागासोबतच एफडीसीएम (फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र) यांच्याकडे आहे.

टॅग्स :एमएमआरडीए