सोनसाखळी चोऱ्या रोखण्यासाठी ठाण्यात ५०० पोलीस तैनात

By Admin | Updated: May 28, 2015 22:57 IST2015-05-28T22:57:47+5:302015-05-28T22:57:47+5:30

धूम स्टाइलने मोटारसायकलवरून धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी सुमारे ५०० पोलिसांची फौजच सज्ज केली आहे.

500 police personnel posted in Thane to prevent snooping of thieves | सोनसाखळी चोऱ्या रोखण्यासाठी ठाण्यात ५०० पोलीस तैनात

सोनसाखळी चोऱ्या रोखण्यासाठी ठाण्यात ५०० पोलीस तैनात

पंकज रोडेकर ल्ल ठाणे
दिवसेंदिवस महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी ठाणे शहर पोलिसांनी नवा प्रयोग केला असून धूम स्टाइलने मोटारसायकलवरून धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी सुमारे ५०० पोलिसांची फौजच सज्ज केली आहे. प्रामुख्याने गर्दीच्या वेळेत (सकाळ-सायंकाळी) चौकाचौकांत ही फौज चोरट्यांवर लक्ष ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे शहर आणि उपनगरांत महिलांनी दागिने घालून बाहेर पडायचे की नाही, असा प्रश्न काही दिवसांपासून सातत्याने घडणाऱ्या घटनांनी उपस्थित होत आहे. दोन-तीन वर्षांपासून सोनसाखळी चोरीच्या घटनेत दुपटीने वाढ झाल्याचे पोलीस आकडेवारीवरून स्षष्ट होते.
२०१२ या वर्षात ५६९ सोनसाखळी चोरीच्या घटनांपैकी ४५ टक्के गुन्हे उघडकीस आले. हे प्रमाण रोखण्यासाठी त्या वेळी मोक्कासारख्या कठोर कायद्याचा वापर करूनही २०१३ मध्ये ८०८ घटना घडून सोन्याचे दागिने लांबविण्यात आले होते. त्यापैकी ३६२ घटना उघडकीस आणून त्या वेळी इराणी टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना बऱ्यापैकी यश आले होते. त्याचबरोबर २०१४ मध्ये पोलिसांनी थेट नागरिकांशी संवाद साधून कशा प्रकारे खबरदारी घेतली पाहिजे, याबाबत मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी थेट चर्चा घडवून आणली. तसेच पथनाट्यांद्वारे ठाणेकरांमध्ये जगजागृती केली. तरीसुद्धा त्या वर्षात सोनसाखळी चोरीच्या घटनांचा आकडा ९७६ च्या घरात पोहोचला. त्यापैकी ३०२ घटना उघडकीस आल्याचे सूत्रांनी
सांगितले.

प्रत्येक चौकात दोन / तीन पोलीस
सोनसाखळी चोरीचे वाढते गुन्हे रोखण्यासाठी
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पाचही परिमंडळांत घडलेल्या घटनांचा अभ्यास केला. त्यानुसार, एकाच परिमंडळासाठी विचार न करता पाचही परिमंडळांत ५०० पोलिसांची फौज उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या एखाद्या चौकात दोन-तीन पोलीस दिसल्यास नवल वाटू नये.

वाढत्या गुन्ह्यांचा अभ्यास करूनच सुमारे ५०० पोलीस तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रामुख्याने ऐन गर्दीच्या वेळेत चौकाचौकांत पोलीस तैनात राहणार आहेत.
- व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण, सहपोलीस आयुक्त, ठाणे शहर

Web Title: 500 police personnel posted in Thane to prevent snooping of thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.