५0 महिला डब्यांत १५0 सीसीटीव्ही

By Admin | Updated: June 18, 2016 05:07 IST2016-06-18T05:07:29+5:302016-06-18T05:07:29+5:30

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलच्या महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्यात येत आहेत. एका लोकलमधील महिला डब्यात सीसीटीव्ही बसवून त्याची यशस्वी चाचणी झाल्यानंतर आता

50 women cabins have 150 cctv | ५0 महिला डब्यांत १५0 सीसीटीव्ही

५0 महिला डब्यांत १५0 सीसीटीव्ही

मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलच्या महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्यात येत आहेत. एका लोकलमधील महिला डब्यात सीसीटीव्ही बसवून त्याची यशस्वी चाचणी झाल्यानंतर आता ५0 महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला वेग आला आहे. हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. जवळपास १५0 पेक्षा जास्त सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन आहे.
लोकलमधून प्रवास करताना महिला प्रवाशांना गर्दुल्ले किंवा चोरांकडून मारहाणीबरोबरच विनयभंगाच्या घटना गेल्या काही वर्षांत सातत्याने घडत आल्या आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे लोकलच्या महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील एका लोकलमधील महिला डब्यात सीसीटीव्ही काही महिन्यांपूर्वीच बसविण्यात आले आणि त्याची यशस्वीरीत्या चाचणी घेण्यात आली. त्यानंतर आणखी तीन लोकलमधील नऊ महिला डब्यांत सीसीटीव्ही बसविण्याचे काम पश्चिम रेल्वेकडून पूर्ण करण्यात आले. एकूण १७ लोकलमधील ५0 महिला डब्यात सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेकडून करण्यात येत असून हे काम प्रगतिपथावर आहे.
पश्चिम रेल्वेकडून सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन केले जात असतानाच मध्य रेल्वेकडूनही महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका लोकलमधील महिला डब्यात काही महिन्यांपूर्वीच सीसीटीव्ही बसविण्यात आल्यानंतर सीसीटीव्ही असणारी पहिली लोकल ३ आॅक्टोबर २0१५ पासून सेवेत आली आणि ही चाचणी यशस्वी झाली. त्यानंतर मध्य रेल्वेच्या दहा लोकलमधील एकूण ५0 महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून प्रत्येक डब्यात तीन ते चार सीसीटीव्ही बसविले जातील, अशी माहिती मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. जवळपास असे १५0 पेक्षा जास्त सीसीटीव्ही बसविले जाणार असून त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून माटुंगा वर्कशॉपमध्ये त्याचे काम चालेल. (प्रतिनिधी)

पॅनिक बटनचा होतोय काहीसा त्रास
- एका लोकलमधील महिला प्रवाशांच्या डब्यात नुकतेच पॅनिक बटनही बसविण्यात आले आहे. मात्र या पॅनिक बटनचा काहीसा त्रास मध्य रेल्वेला होत आहे. त्याचा दुरुपयोग काहींकडून केला जात असून त्यामुळे लोकल गाड्यांना बराच वेळ थांबा मिळत आहे.
- महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरील एकूण १७ लोकलमधील ५0 महिला डब्यात सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे. मात्र हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यानंतर त्याचे नियंत्रण रेल्वे सुरक्षा दलाकडे असले तरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण गार्डलाही पाहता यावे यावर विचार केला जात आहे.

माटुंगा वर्कशॉपमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम केले जाणार आहे. प्रत्येक डब्यात तीन ते चार सीसीटीव्ही बसविले जातील.
- नरेंद्र पाटील, मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी

Web Title: 50 women cabins have 150 cctv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.