विमानतळ डस्टबिनमध्ये ५० लाखांचे सोने

By Admin | Updated: January 8, 2015 02:09 IST2015-01-08T02:09:55+5:302015-01-08T02:09:55+5:30

कस्टमच्या एअर इंटेलिजन्स युनिटने गेल्या दोनेक दिवसांत केलेल्या कारवायांवरून परदेशातून भारतात होणाऱ्या सोन्याच्या तस्करीत अचानक वाढ झाल्याचे संकेत मिळत आहेत.

50 lakh gold in airport dustbin | विमानतळ डस्टबिनमध्ये ५० लाखांचे सोने

विमानतळ डस्टबिनमध्ये ५० लाखांचे सोने

मुंबई : कस्टमच्या एअर इंटेलिजन्स युनिटने गेल्या दोनेक दिवसांत केलेल्या कारवायांवरून परदेशातून भारतात होणाऱ्या सोन्याच्या तस्करीत अचानक वाढ झाल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या दोन दिवसांत पाच कारवायांमध्ये एआययूने तस्करीतले तब्बल १० किलो सोने हस्तगत केले. तस्करांमध्ये ब्रिटिश, श्रीलंकन नागरिकांचा सहभाग आहे. तिकिटांचे दर उतरल्याने तस्करी जोरात सुरू झाल्याची शक्यता एआययूकडून व्यक्त होत आहे.
दुबई व्हाया दोहा येथून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या तौसीफ आलम रईस आलम कुरेशी हा प्रवासी आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात सोने आणणार असल्याची आगाऊ माहिती एआययूला मिळाली होती. त्यानुसार ग्रनी चॅनेलमधून बाहेर पडलेल्या कुरेशीला एआययू अधिकाऱ्यांनी अडवून झाडाझडती घेतली, मात्र त्याच्याकडे सोने नव्हते. त्याच्याकडे कसून चौकशी केली गेली, तेव्हा दुबईतून आणलेले सोने विमानतळाच्या शौचालयातील कचऱ्याच्या डब्यात दडविल्याची कबुली कुरेशीने दिली. त्यानुसार केलेल्या तपासणीत कचऱ्याच्या डब्यात सोने सापडले. मोजदात केल्यानंतर कुरेशीने ४९.५६ लाखांचे १,९८२ ग्रॅम वजनाचे सोने सोबत आणल्याचे स्पष्ट झाले.
मॉरीशसहून मुंबईत आलेल्या श्रीलंकन नागरिक महोम्मद हिल्मी याच्याकडून एआययूने सुमारे दोन किलो सोने हस्तगत केले. हे सोने त्याने इस्त्रीतून दडवून आणले होते. इस्त्रीच्या वायरमध्येही तांब्याऐवजी सोनेच होते. हिल्मीप्रमाणे इरफान महोम्मद इस्माईल या ब्रिटिश नागरिकानेही आणलेले तीन किलो सोने एआययूने पकडले. इस्माईल हाँगकाँगहून मुंबईला आला होता. याखेरीज शारजाहहून परतलेल्या अब्बास अब्दुल्ला या प्रवाशाकडून साडेसतरा लाखांचे तर हुजैफा इस्माईल पाटणवाला या प्रवाशाकडून साडेअकरा लाखांचे सोने हस्तगत करण्यात आले. (प्रतिनिधी)

नाताळ, थर्टीफर्स्टनिमित्त भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या मोठी होती. त्यामुळे विमान तिकिटाचे दरही वाढले होते. महाग तिकिटामुळे सोने किंवा अन्य तस्करीत घट झाल्याचे दिसले. मात्र जसा सुटीचा किंवा सणांचा हंगाम संपला तसे ही तस्करी पुन्हा पूर्वपदावर आल्याचे आमचे निरीक्षण आहे.
मिलिंद लांजेवार, अपर आयुक्त, एअर इंटेलिजन्स युनिट

Web Title: 50 lakh gold in airport dustbin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.