जलयुक्त शिवारासाठी ५० कोटी
By Admin | Updated: April 14, 2015 22:39 IST2015-04-14T22:39:42+5:302015-04-14T22:39:42+5:30
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियांनांंतर्गत १५ तालुक्यांत ४५ कामांसाठी ५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

जलयुक्त शिवारासाठी ५० कोटी
अलिबाग : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियांनांंतर्गत १५ तालुक्यांत ४५ कामांसाठी ५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून, पहिल्या पावसानंतर त्या ठिकाणी जलपूजनाचा कार्यक्रमही करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिली आहे. जलयुक्त शिवारातील बंधारे उत्तम होतील, याकडे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे, यात काही हलगर्जीपणा झाल्यास संंबंधितांविरुद्ध निलंबनाची कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी तंबीही भांगे यांनी दिली आहे.
‘सर्वांसाठी पाणी’, टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ योजनेंतर्गत टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी २६ जानेवारी २०१५ पासून रायगड जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. त्याकरिता विविध विभागांतर्गत मंजूर योजनांच्या निधीतून, लोकसहभागाच्या माध्यमातून टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे.
या अभियानांतर्गत पावसाचे पाणी गावाच्या शिवारात अडविणे, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी संरक्षित पाणी वा पाण्याच्या वापरांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांचे पुनर्जिवीकरण करून पाणीपुरवठ्यात वाढ करणे, भूजल अधिनियमांची अंमलबजावणी करणे, विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करणे, पाणी साठवणीसाठी नवीन कामे हाती घेणे आदी कामांचा समावेश आहे.
अस्तित्वात व निकामी बंधारे, गाव तलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधारे यासारख्या जलस्रोतांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे, जलस्रोतांमधील गाळ काढणे, वृक्ष लागवड, पाण्याच्या ताळेबंधाबाबत जनतेत जागृती निर्माण करणे आदी अभियानाचे उद्देश असल्याचे भांगे सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
बंधाऱ्यांची निर्मिती
४जलयुक्त शिवार अभियान शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, लोकसहभाग, खाजगी उद्योजक यांच्याकडील उपलब्ध निधीतून राज्यातील पाणीटंचाई भासू नये यासाठी राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कंपन्यांनी शासनाच्या तांत्रिक मदतीने स्वतंत्ररीत्या बंधाऱ्याची निर्मिती करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
४अलिबाग : जलयुक्त शिवार प्रचार रथात नमूद असलेल्या माहितीच्या अनुरूप जिल्ह्यात सर्व ठिकाणची कामे योग्य वेळेत व उत्तम दर्जाची करु न हे अभियान यशस्वी करावे. ज्या ठिकाणी या कामांची गरज आहे तेथे प्राधान्याने कामे घ्यावीत. जिल्ह्यातील सर्व संबंधितांना याचा लाभ होईल असे पाहावे, असे आवाहन अलिबागचे आमदार सुभाष तथा पंडितशेठ पाटील यांनी मंगळवारी केले आहे.
४रायगड जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान २६ जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत राबविण्यात येणार असून या अभियानाची माहिती देण्यासाठी तसेच जनजागृती करण्यासाठी प्रचार रथाची निर्मिती केली असून या प्रचार रथाचा शुभारंभ आमदार सुभाष तथा पंडितशेठ पाटील यांच्याहस्ते व जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
४१४ एप्रिल ते १३ मे या कालावधीत हा प्रचार रथ जिल्ह्यातील १५ तालुक्यांत फिरणार असून त्यामार्फत लोकांना अभियानाची माहिती दिली जाईल. १४ एप्रिल रोजी खंडाळा (ता. अलिबाग), १५ व १६ एप्रिल रोजी आरावघर, शिघ्रे, सायगांव व नागशेत (ता. मुरुड), १७ व १८ एप्रिल रोजी खोपे, विर्झोली, पाथरशेत (ता.रोहा) येथे प्रचार रथ जाणार आहे.