Join us
Daily Top 2Weekly Top 5

M-UTS सुविधेचा ५.४० लाख प्रवाशांनी घेतला लाभ; एकाच महिन्यात २.२२ कोटींचा महसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 16:57 IST

Central Railway M-UTS News: प्रवाशांना डिजिटल किंवा रोख पेमेंटचा पर्याय उपलब्ध आहे.

Central Railway M-UTS News: मध्य रेल्वेने यूटीएस प्रणाली, रेल वन सारखे मोबाइल तिकीट ॲप्स इत्यादी विविध उपायांद्वारे आपल्या प्रवाशांना तिकीट काढण्याची सुविधा सुलभ करण्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. तिकीट सुविधेमधील सर्वात नवीन भर म्हणजे मोबाइल यूटीएस सहाय्यक. मध्य रेल्वेने ही सुविधा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दिनांक ३१.१०.२०२५ रोजी सुरू केली असून, तिकीट खरेदीसाठी प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी ३ सहाय्यक तैनात केले आहेत. 

उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांची अपेक्षित गर्दी आणि मिळालेला सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन, जानेवारी २०२६ मध्ये आणखी ५ सहाय्यकांची भर घालण्यात आली, ज्यामुळे एम-यूटीएस सहाय्यकांची एकूण संख्या ८ झाली. ३१ ऑक्टोबर ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत, या एम-यूटीएस सहाय्यकांनी प्रत्येक प्रवाशाकडे जाऊन सोपी आणि जलद तिकीट सेवा पुरवून ५.४० लाख प्रवाशांना ३.८६ लाख तिकिटे जारी केली आहेत आणि मध्य रेल्वेच्या वाणिज्यिक महसुलात ६.८९ कोटी रुपयांची भरीव भर घातली आहे.

एकाच महिन्यात २.२२ कोटींचा महसूल

केवळ एप्रिल महिन्यातच १.७२ लाख प्रवाशांसाठी एकूण १.२५ लाख तिकिटे जारी करून २.२२ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला आहे. एम-यूटीएस सहाय्यकांना मोबाईल फोन आणि एक लहान तिकीट छपाई मशीन पुरवले जाते. हे एम-यूटीएस सहाय्यक कॉनकोर्समध्ये, होल्डिंग एरियामध्ये किंवा रेल्वेच्या आवारात प्रत्येक व्यक्तीकडे जाऊन तिकीट भाडे घेऊन तिकिटे देतात. त्याशिवाय त्यांना काउंटरमध्ये बसून तिकीट देण्याची परवानगी देखील आहे. प्रवाशांना डिजिटल किंवा रोख पेमेंटचा पर्याय उपलब्ध आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेच्या या उपक्रमाने जलद आणि सोयीस्कर तिकीट सुविधा देण्यासोबतच तिकीटविरहित प्रवासाला आळा घालण्यासही मदत केली आहे. जागेवरच तिकिटे सहज उपलब्ध झाल्यामुळे, तिकिटांच्या लांब रांगा आणि प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे तिकीटविरहित प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. मोबाईल यूटीएस सहायकांची सुविधा हा मध्य रेल्वेचा तिकीट प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि त्याद्वारे आपल्या प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यासाठीचा आणखी एक प्रवासी-स्नेही उपक्रम आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : M-UTS Facility Benefits 5.4 Lakh Passengers, Earns ₹2.22 Crore

Web Summary : Central Railway's M-UTS assistants facilitated 5.4 lakh passengers, issuing 3.86 lakh tickets, generating ₹6.89 crore revenue. In April alone, ₹2.22 crore was earned from 1.25 lakh tickets. The initiative curbs ticketless travel by providing easy access to tickets.
टॅग्स :मध्य रेल्वेमुंबई लोकललोकलछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस