Join us

सोमय्या इन्क्युबेशनला ५ कोटी रुपयांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 03:27 IST

१६ सेंटरची निवड : मुंबईतून तीन संस्था

मुंबई : राज्यामध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि स्टार्ट-अप सुविधा उपलब्ध करणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्रभरातील १६ इन्क्युबेशन सेंटर्ससाठी निधीची घोषणा केली. यासाठी मुंबईतून केवळ तीन शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली आहे. शहरातील सोमय्या आरआयआयडीएल (रिसर्च इनोव्हेशन इन्क्युबेशन डिझाइन लॅबोरेटरी) फाउंडेशन या सोमय्या विद्याविहारमधील उपक्रमाचा त्यामध्ये समावेश आहे. निधी देण्यासाठी निवडण्यात आलेल्या अन्य दोन संस्थांमध्ये नीरी व मुंबई विद्यापीठ यांचा समावेश आहे. सोमय्या आरआयआयडीएलला राज्य सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीकडून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

२०१० मध्ये स्थापना झाल्यापासून, आरआयआयडीएलने ७०हून अधिक स्टार्ट-अपना पाठबळ दिले आहे आणि दर आठवड्याला सरासरी २ ते ३ स्टार्ट-अप अर्ज प्राप्त होतात. आरआयआयडीएलने सुरुवातीपासूनच आरोग्यसेवा, फूड, कृषीतंत्रज्ञान, एम्बडेड इलेक्ट्रॉनिक्स व एसएमएसी या क्षेत्रांवर भर देण्याचे निश्चित केले आहे. यापुढेही मिळालेल्या निधीचा वापर सध्याच्या इन्क्युबेशन सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि स्टार्ट-अपना पाठिंबा देण्यासाठी व त्यांचा विकास करण्यासाठी अन्य खर्चांसाठी केला जाणार आहे.

विद्यार्थी व अन्य व्यक्तींना नावीन्य व उद्योजकता यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सोमय्या आरआयआयडीएल इन्क्युबेशन सेंटरची निर्मिती करण्यात आली. यामध्ये अनेक इन्क्युबेटेड कंपन्या विकसित झाल्या आहेत व स्वतंत्र कंपन्या म्हणून कार्यरत आहेत. संकुलामध्ये असल्याने, विद्यार्थ्यांना सर्व विषयांतील तज्ज्ञ, प्राध्यापकांकडून मार्गदर्शन व कल्पना विकसित करण्यासाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध होत असल्याची माहिती चिफ इनोव्हेशन कॅटलिस्ट गौरांग शेट्टी यांनी दिली. आमच्या मेकर मेला सुविधेद्वारे इनोव्हेटर्सची निर्मिती करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. या पाठिंब्यामुळे आम्हाला तळागाळापर्यंतचे इनोव्हेटर्स / उद्योजकांपर्यंत पोहोचणे शक्य होणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

सोमय्या विद्याविहारमध्ये ३४ संस्था असून त्यामध्ये ३९ हजारहून अधिक विद्यार्थी व दीड हजाराहून अधिक शिक्षक आहेत. मुख्य संकुल मुंबई येथे आहे, पण सोमय्या विद्याविहारतर्फे ग्रामीण भागात साकरवाडी, डहाणू, लक्ष्मीवाडी, कोपरगाव, समीरवाडी, बागलकोट, भोपाळ व कच येथे सहा शाळा चालविल्या जातात.

टॅग्स :हॉस्पिटलआरोग्य