Join us  

नरवीर तानाजी मालुसरेंच्या जन्मस्थळासाठी ५ कोटी; राज्य सरकारची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 11:46 PM

अर्थराज्यमंत्री ; उमरठच्या विकासाचा कृती आराखडा तयार करणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने साकारलेल्या तान्हाजी या सिनेमातून नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहचण्यास मदत झाली. कोंढाणा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली. याच पार्श्वभूमीवर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जन्मभूमी स्थळाच्या विकासासाठी पाच कोटींची तरतूद करण्याची घोषणा अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी गुरूवारी रात्री विधान परिषदेत केली. तसेच उमरठच्या विकासाचा कृती आराखडा तयार करण्याच आश्वासनही देसाई यांनी दिले. 

अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अर्थराज्यमंत्री नाईक बोलत होते. अर्थसंकल्पावरील चर्चेतील उत्तरात राज्यमंत्र्यांनी केवळ महाविकास आघाडीतील नेत्यांशी संदर्भातील कामांची दखल घेतल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला होता. तसेच स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उमरठच्या विकासासाठी मागाल ते सर्व देण्याचे आश्वासन स्थानिकांना दिले होते. प्रत्यक्षात त्यासाठी कोणतीच घोषणा केली नाही. किमान मुख्यमंत्री जी आश्वासने देतात त्याची तरी नोंद ठेवा, असा टोला दरेकरांनी लगावला. 

यावर, तानाजी मालुसरे जन्मस्थळ विकासाचा कृती आराखडा निश्चित करण्याचे आश्वासन राज्यमंत्री देसाई यांनी दिले. आता पाच कोटींची तरतूद करू, असेही ते म्हणाले. तत्पूर्वी उत्तराच्या भाषणात देसाई यांनी शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून महाविकास आघाडीने अर्थसंकल्प सादर केल्याचे सांगितले. आर्थिक अडचणी असल्या तरी उत्पन्नाचे स्रोत वाढवू, अतिरिक्त खर्चाला कात्री लावत विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.

वरळी येथे पर्यटन केंद्र विकसित करण्यावर विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतला होता. यावर, दुग्ध विकास विभागाची जागा पडून आहे. यातून सरकारला  एक रुपयाचेही उत्पन्न नाही. अशा ठिकाण जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र उभारून उत्पन्न मिळवण्यासाठी हे महत्वाचे पाऊल असल्याचे राज्यमंत्री म्हणाले. मालेगाव येथे महात्मा फुले विद्यापीठ अंतर्गत स्वतंत्र कृषी विज्ञान संकुल उभारण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच, औरंगाबाद येथील क्रिडा संकुलाचा प्रस्ताव का आला नाही, याबाबत अधिवेशनानंतर क्रिडा विभागाशी चर्चा करून कार्यवाही करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

 

टॅग्स :विधान परिषदतानाजीराज्य सरकार