Join us  

गोवंडी, मानखुर्दमध्ये 49 बेकायदा नर्सिंग होम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 5:19 AM

माहितीच्या अधिकारात उघड; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, मुंबईत होऊ शकते भंडारा जिल्ह्याची पुनरावृत्ती

मुंबई : मुंबईतील काही नोंदणीकृत नर्सिंग होममध्ये अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे. देवनार, गोवंडी, मानखुर्द या एम पूर्व विभागातील या भागांमध्ये विनापरवाना ४९ नर्सिंग होम आणि खाजगी रुग्णालये राजरोस सुरू असल्याचे उघड झाले आहे.भंडारा येथील रुग्णालयात शनिवारी लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत दहा बाळांचा दुर्दैवी अंत झाला. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या दुर्घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत. मुंबईतही दररोज छोट्यामोठ्या आगीच्या घटना घडत असतात. अशा दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दलाने काही नियम बनविले आहेत. या अंतर्गत रुग्णालय, नर्सिंग होमचालकांना आग प्रतिबंधक उपाययोजना राबविणे बंधनकारक आहे. मात्र मुंबईतील काही रुग्णालये, नर्सिंग होममध्ये या नियमांचे उल्लंघन केले जात आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी एम पूर्व विभागातील बेकायदेशीर नर्सिंग होमची माहिती मागवली होती. त्यानुसार मुंबईत एकूण एक हजार ३१९ रुग्णालये आहेत. त्यापैकी ६० रुग्णालये एम पूर्व विभागात सुरू असून त्यातील ४९ बेकायदेशीर आहेत, अशी माहिती देण्यात आली. बहुतांश रुग्णालये आणि प्रसूतिगृहे ही इमारतींमध्ये आहेत. त्यात चेंज ऑफ युजर होत नसल्याने या रुग्णालयांना अग्निशमन दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याचे अग्निशमन दलातील सूत्रांकडून समजते.

मुंबईत आतापर्यंतच्या रुग्णालयातील आगीच्या घटनाn २९ ऑक्टोबर २०२० - दहिसर, कांदरपाडा परिसरात कोविड रुग्णालयात अतिदक्षता उपचार केंद्रात एका रुग्णाच्या शेजारी असलेल्या वैद्यकीय उपकरणाला अचानक आग लागली. या वेळी प्रसंगावधान राखत तेथे उपस्थित परिचारिकांसह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली.n १२ ऑक्टोबर २०२० - मुलुंड येथील अपेक्स रुग्णालयात जनरेटरला लागलेल्या आगीत रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित झाला होता. या रुग्णालयातील ४० रुग्णांना इतर रुग्णालयांत दाखल करताना एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.n १७ डिसेंबर २०१८ - अंधेरीतील कामगार रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत सहा लोकांचा मृत्यू, तर १४६ जण होरपळले होते.

अग्निशम दलाला आणि प्रशासनाला मुंबईतील रुग्णालयांचे ऑडीट करण्याचे निर्देश दिले आहेत- किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई

महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलही गांभिर्याने लक्ष देत नाही. ज्या ठिकाणी नागरीकांची वर्दळ जास्त आहे. त्या इमारती सुरक्षित असल्याचं पाहिजे. त्यासाठी ठोस उपाय नियत कालावधीनंतर करणे गरजेचे आहे''.- रवी राजा, विरोधी पक्षनेते

नोव्हेबर २०१९ मध्ये परळ येथील केईएम रुग्णालयात ईसीजी मशिनला आग लागून दोन महिन्याच्या बालकाचा हात जळला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.मात्र,मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले असल्याचा दावा पालिका अधिकारी करीत आहेत.

पालिका रुग्णालयांत अग्निरोधक यंत्रणा सक्षम नाहीच

n भंडारा येथील आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहर उपनगरातील पालिका रुग्णालयांचा आढावा घेतला असता रुग्णालय, आरोग्य केंद्र आणि नर्सिंग होमय आदी ठिकाणी अग्निरोधक यंत्रणा सक्षम नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे या वैद्कीय संस्थांमध्ये अग्निसुरक्षा प्रमाणपत्रही नसून अग्निशमन दलाच्या कोणत्याही नियमांचे पालन करण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे. परिणामी, मुंबईकरांचा जीव धोक्यात असल्याची बाब समोर आली आहे.n शहर उपनगरातील रुग्णालयांमध्ये अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नाही, फायर एक्सटिंगुझशेरसारख्या अनेक गोष्टीत नाहीत, आपत्तीकाळात बाहेर पडण्याच्या मार्गात अडथळे आहेत.

n याविषयी अधिक माहिती घेताना, पालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले , अग्निशमन दलातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१८ मध्ये महापालिकेची पाच मोठी रुग्णालय रुग्णालय आणि २०४ दवाखान्यांची तपासणी कऱण्यात आली होती. मात्र खासगी रुग्णालयांमध्ये कोणतीही तपासणी कऱण्यात आलेली नाही. मुंबईतील आग प्रतिबंधक आणि जीव सुरक्षा कायद्यांतर्गत सर्व रुग्णालयांना दर सहा महिन्यांनी फायर आॅडिट कऱणे सक्तीचे असल्याचा सूचना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.n अग्निशमन विभागाने अशी घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी. रुग्णालयाची यंत्रणा योग्य ठेवण्यात यावी, असे आदेश दिल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र