Join us

४,६१३ थकबाकीदारांना ‘शॉक’; वीजपुरवठा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 11:29 IST

Mumbai News: आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही तास शिल्लक असून, वीज बिलाची थकबाकी न भरलेल्या भांडुप परिमंडळातील चार हजार ६१३ ग्राहकांचा पुरवठा महावितरणने तात्पुरता खंडित करत त्यांना ‘शॉक’ दिला आहे.

 मुंबई  - आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही तास शिल्लक असून, वीज बिलाची थकबाकी न भरलेल्या भांडुप परिमंडळातील चार हजार ६१३ ग्राहकांचा पुरवठा महावितरणने तात्पुरता खंडित करत त्यांना ‘शॉक’ दिला आहे. मार्चमध्ये केलेल्या या कारवाईतून सरकारी कार्यालयेही सुटलेली नाहीत. दरम्यान, या थकबीकादारांमध्ये ठाणे शहर मंडलातील एक हजार २९८, वाशी मंडलातील एक हजार ७७९, आणि पेण मंडलातील एक हजार ५३६ ग्राहकांचा समावेश आहे.

भांडुप परिमंडळातील ग्राहकांकडे एकूण ७५ कोटी ९६ लाख रुपयांची थकबाकी वसूल होणे बाकी आहे. यात ठाणे शहर मंडळअंतर्गत २३ कोटी ८८ लाख, वाशी मंडळअंतर्गत १३३ कोटी ६५ लाख आणि पेण मंडळात १८ कोटी ४३ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीच्या वसुलीसाठी सध्या सर्वच स्तरांतील अधिकारी, अभियंते, जनमित्र सध्या फिल्डवर आहेत. थकबाकीदांराचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

अभय योजना उद्या संपणारवीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी किंवा सहा हप्त्यांत भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनर्जोडणीची संधी देणाऱ्या अभय योजनेची मुदत ३१ मार्चला संपत आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा.

आज, उद्या वीजबिल भरणा केंद्रे सुरूआर्थिक वर्षअखेरीमुळे वीज बिल भरणा केंद्र शनिवार, रविवार आणि सोमवारी (२९ ते ३१ मार्च) या सुट्टीच्या दिवशी सुरू आहेत. ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकीचा भरणा करावा. सुट्टीच्या दिवशीही कारवाईची मोहीम सुरू राहणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी मोबाइल ॲप, संकेतस्थळ, तसेच विविध पेमेंट वॉलेटद्वारे ऑनलाइन वीजबिलाचा भरणा करण्याचे आवाहन केले आहे.

सरकारी कार्यालयांकडे १६९ कोटींची थकबाकीभांडुप परिमंडळातील विविध सरकारी आस्थापना व कामांसाठीच्या १३ हजार ८१९ वीजजोडण्यांची १६९ कोटी ९० लाख रुपयांची थकबाकी आहे. सर्वाधिक थकबाकी ग्रामपंचायतींच्या पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या वीजजोडण्यांची आहे.

१,८२८ जोडण्यांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला आहे. यांच्याकडे चार कोटी १७ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.   

टॅग्स :मुंबईवीज