Join us  

४६ टक्के विद्यार्थ्यांची वातावरण बदलावर भविष्यात संशोधनाचीही तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 6:24 PM

विद्यार्थी लॉकडाऊनमध्ये होत आहेत पर्यवर्णविषयी अधिक जागरूक

 

सीमा महांगडे

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग लॉकडाऊन होऊन घरात  बसले आहे.मात्र या काळात लोकांची पर्यावरणाविषयीची जागरूकता अधिक वाढली आहे. विशेष  विद्यार्थ्यांची संख्या  सर्वाधिक असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.  या सर्वेक्षणातून आवश्यकता नसताना विजेची उपकरणे बंद करणे, पाण्याची बचत, स्वतःच्या घरातील, बागेतील झाडांची काळजी, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती आदी माध्यमातून विद्यार्थी घरबसल्या पर्यावरणाची काळजी घेत असून पर्यावरण संरक्षणाप्रति ते जागरूक असल्याचे दिसून आले आहे.वातावरणात  बदलांवर विद्यार्थ्यांचा नेमका दृष्टिकोन काय ? ते वातावरणातील बदलांसाठी काय करतात , त्यांना त्याची माहिती कुठून मिळते याची माहिती संकलित करण्यासाठी ब्रेनली या संस्थेने सर्वेक्षण हाती घेतले. देशभरातील सुमारे ३००० विद्यार्थ्यांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवला होता. लॉकडाऊनमध्ये मिळालेला अतिरिक्त वेळ विद्यार्थी आपल्या कुटुंबियांसमवेत व्यतीत करीत आहेत तसेच त्यांचे अवांतर वाचनही सुरु आहे. मात्र याच जोडीला ते पर्यावरणाची ही विशेष काळजी घेत आहेत.  पर्यावरणासंबंधी सर्वाधिक माहिती विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून उपलब्ध होत असल्याचे ६० टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. ४६ टक्के विद्यार्थ्यांनी त्यांना ऑनलाईन माध्यमातून माहिती उपलब्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच टीव्ही, प्रिंट मीडिया, पालकांकडून यासंदर्भात माहिती मिळत असल्याचे अनुक्रमे ३८.४ टक्के, १६.९ टक्के, ३५.८ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले.८३.९ टक्के विद्यार्थ्यांनी हवामान बदल हा वास्तविक असल्याचे म्हटले आहे. प्रदूषणामुळे पर्यावरणाला सर्वाधिक धोका असल्याचे ५१ टक्के विद्यार्थ्यांनी नमूद केले तर जागतिक तापमानवाढ, उध्वस्त सागरी जीवन हे देखील पर्यावरणाला हानी पोहोचविण्यात प्रमुख भूमिका बजावत असल्याचे सुमारे ३० टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले.सर्वेक्षणात सामील ७१.२ टक्के विद्यार्थ्यांनी हवामान बदलात रस असल्याचे म्हटले आहे तर त्यापैकी ४६ टक्के विद्यार्थ्यांनी हवामान आणि वातावरण बदलावर स्वत: संशोधन करणार असल्याचे देखील म्हटले आहे.  एकूणच बदलत्या हवामान बदलांवर  परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांचा पर्यावरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. या बदलासाठी ते तयार असून त्यावरील उपाययोजनांसाठी ही त्यांनी कंबर कसली आहे.

टॅग्स :पर्यावरणकोरोना वायरस बातम्याशिक्षण क्षेत्रकोरोना सकारात्मक बातम्या