शहरात बसविणार ४५१ सीसीटीव्ही

By Admin | Updated: August 27, 2014 00:42 IST2014-08-27T00:42:02+5:302014-08-27T00:42:02+5:30

महापालिका क्षेत्रात नवीन ४५१ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. त्यासाठी प्रशासनातर्फे सुमारे १७ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे

451 CCTV to be set up in city | शहरात बसविणार ४५१ सीसीटीव्ही

शहरात बसविणार ४५१ सीसीटीव्ही

नवी मुंबई : महापालिका क्षेत्रात नवीन ४५१ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. त्यासाठी प्रशासनातर्फे सुमारे १७ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. मंगळवारी झालेल्या महासभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
महानगर पालिकेतर्फे यापूर्वी शहरात २६४ सिसिटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शहरातील रस्ते, गर्दीचे चौक याठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यानुसार शहरातील सिसिटीव्ही कॅमेऱ्यांचे हे जाळे अधिक तीव्र केले जाणार आहे. याकरीता अधिक ४५१ सिसिटीव्ही कॅमेरे शहरात बसवले जाणार आहेत. याकरीता मंगळवारी झालेल्या महासभेने मंजुरी दिली. सध्या शहरात बसवलेल्या कॅमेऱ्यांमुळे ३३३ गुन्ह्यांच्या तपासाकरीता पोलिसांना मदत झालेली आहे. त्यापैकी ६३ गुन्हयांचा तपास यशस्वी झालेला आहे. त्यामध्ये अपघाताचे ६८, हत्येचे २०, सोनसाखळी चोरीचे १११, अपहरणाचे ९, वाहन चोरीचे १११, मालमत्ता/व्यक्ती हरवल्याचे २३ तसेच इतर ५४ घटनांचा समावेश आहे. त्यामुळे प्रशासनाचा हा उपक्रम यशस्वी ठरल्याची कौतुकाची थाप सर्वच स्तरातून मिळत आहे. त्यानुसार शहरातील इतर आवश्यक ठिकाणी देखिल सिसिटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी होत होती.
त्याप्रमाणे नव्या १०६ ठिकाणी एकूण ४५१ कॅमेरे बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याकरीता १७ कोटी ३५ लाख रुपयांच्या खर्चाची अपेक्षा आहे. या खर्चातून लिज लाईन भाडे व कॅमेऱ्यांची देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. हा खर्च मंजुरीचा प्रस्ताव मंगळवारी महासभेपुढे आला असता सर्वमताने त्यास मंजुरी मिळाली. तसेच भारत सरकारच्या स्मार्ट सिटी धोरणाअंतर्गत मिळणाऱ्या निधीची मागणी देखिल याकरीता केली जाणार आहे. सिसिटीव्ही कॅमऱ्याचे हे नवे जाळे बसवण्यासाठी सुमारे ६ महिने कालावधी लागण्याची अपेक्षा आहे. त्यामध्ये शहराचे प्रवेशद्वार, बस स्थानके, रेल्वे स्थानक आवार, पाम बिच मार्ग, ठाणे बेलापूर मार्ग अशा प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. सदर प्रस्तावाला मंजुरी देत असतानाच सभागृहनेते अनंत सुतार यांनी शहरातील गाव गावठाण भागातही सिसिटीव्ही कॅमेरे बसवले जावेत अशी सूचना केली.
शहरात अधिक नव्या ठिकाणी बसवले जाणारे कॅमेरे देखिल अनेक गैर घटनांची उकल करण्यात उपयुक्त ठरतील असा विश्वास महापौर सागर नाईक यांनी व्यक्त केला. तसेच या प्रस्तावाअंतर्गत पाम बिच मार्गावर अद्ययावत कॅमेरे बसवले जाणार आहेत. त्याद्वारे पामबिच मार्गावर भरधाव वाहनांच्या गतीला लगाम लावता येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तसेच येत्या काही वर्षात संपुर्ण शहरात सिसिटीव्ही कॅमऱ्यांचे जाळे सक्रिय करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 451 CCTV to be set up in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.